नवरात्र उत्सव विशेष जागर आदीमातेचा …

नवरात्रौत्सव विशेष
नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी आडिवरेची
 श्री महाकाली..

संतोष मोंडे
(राजापूर): साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पूर्ण पिठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराप्रमाणे महत्व असलेले राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री महाकाली देवस्थान रत्नागिरी जिल्ह्यातील एक जागृत शक्तीस्थान होय. अश्विन महिन्यात प्रतिवर्षी या ठिकाणी नवरात्रौत्सवात जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरते आणि साऱ्या भाविकांचे पाय श्री महाकाली भेटीच्या ओढीने आडिवरेकडे वळतात.
सागरी महामागार्वरील रमणीय असलेले हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणूनही ख्याती पावले आहे. दूरदूरचे भाविक उत्सव काळात आणि इतरहीवेळी मंदिराला भेटी देत असतात. नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून भाविकांची श्री महाकाली प्रती दृढ श्रध्दा आहे.
        आडिवरे हे एका स्वतंत्र गावाचे नाव नाही तो एक प्रदिर्घ परिसर आहे. इंग्रजी राजवटीत चौदा स्वतंत्र गाव झाले. या सर्वांना मध्यवर्ती स्थान असलेल्या वाडापेठ येथे श्री महाकालीचे मंदिर आहे. अलिकडेच या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. पुर्वीचे संपूर्ण लाकडी स्वरूपात असलेल्या या मंदिराचे नुतनीकरणानंतर रूपडेच पालटले आहे. महाकाली मंदिराचा गाभारा आणि मंदिराचे अंतरंग आणि बाह्यांग अतिशय देखणे आणि अधिक प्रशस्त बनले आहे. मंदिरात उत्तम प्रतिचे मार्बल आणि ग्रॅनाईडमध्ये आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या आहेत.
  श्री महाकालीच्या स्थापनेसंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. श्री महाकाली जिथे सापडली ते वेत्ये हे समुद्रकाठावरील गाव असून तेथे जाधव नावाचे भंडारी समाजाचे लोक राहतात. सुमारे एक हजार वर्षांपुर्वी ते मासे पागण्यासाठी समुद्रात नेहमीप्रमाणे गेले असता त्यांचे जाळे अडकुन पडले. बऱ्याच प्रयत्नांती जाळे वर येईना तेव्हा त्यांनी जलदेवतेची करूणा भाकली. त्याप्रमाणे श्री महाकालीने त्यांच्यापैकी मूळ पुरूषाच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. की मी श्री महाकाली आहे, तु मला वर घे. दुसऱ्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना श्री महाकालीची काळया शिलेची मूर्ती आढळुन आली. देवीच्या दृष्टांताप्रमाणे परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र जमून सर्वांना मध्यवर्ती अशा वाडापेठ येथे देवीची दक्षिणाभिमुख स्थापना केली.
  श्री महाकाली दक्षिणाभिमुख वसलेली असून देवीच्या उत्तरेस तोंड करून श्री महासरस्वती, उजव्या बाजुला श्री महालक्ष्मी या देवींची स्थापना करण्यात आली आहे. या तीन्ही बहिणी एकत्र असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई प्रमाणे या स्थानाची महती आहे. आडिवरे गावाला प्राचीन इतिहास आहे. आडिवरेच्या या श्री महाकाली देवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी चौदाव्या शतकात केली, असे सांगितले जाते.
 या मंदिर पसिरात श्री नगरेश्वर हे स्वयंभु शंकराचे देऊळ आहे. तर प्राकारात श्री रवळनाथाचे,  श्री योगेश्वरीचे मंदिर आहे. या मंदिरात आल्यानंतर दर्शन घेताना विशिष्ट पध्दतीने दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्यामध्ये सर्वप्रथम श्री नगरेश्वर त्यांनतर श्री महालक्ष्मी, श्री रवळनाथ व श्री महाकाली आणि त्यानंतर श्री महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. अत्यंत प्राचीन असलेल्या या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे यांनी भेट देऊन श्री महाकालीचे दर्शन घेतल्याचे पुरावे आढळतात.
 या ठिकाणी दरवर्षी अश्विन शुध्द प्रतिपदा ते विजयादशमी असा नवरात्रौत्सव साजरा होतो. या काळात देवीला वस्त्रांलंकारांनी विभुषीत केले जाते. वस्त्रालंकारांनी सजलेले देवीचे रूप पाहताना भाविक हरखून जातात. श्री महाकाली असंख्य भक्तगणांचे कुलदैवत-ग्रामदैवत आहे. हे मंदिर आडिवरेच्या सांस्कृतिक जडणघडणीचा केंद्रबिंदू आहे. उत्सव काळात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. दुरवरचे भाविक देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. राजापूर शहरापासून सुमारे ३० तर रत्नागिरीपासून सुमारे ४२ कि. मी. अंतरावर हे देवस्थान आहे. श्री महाकाली मंदिराच्या बाजुनेच सागरी महामार्ग झाल्याने या मार्गावरून पर्यटनासाठी जाणारे पर्यटकही आवर्जुन या मंदिराला भेट देत असतात त्यामुळे आडिवरे हे स्थान पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या नकाशावर आले आहे.
  या ठिकाणी पुजारी गुरव मंडळी असून दैनदिन पूजाव्यवस्थेचे काम पाहतात तर १४ जणांचे व्यवस्थापक मंडळ असून त्यांच्या नेतृत्वाखाली मंदिर व्यवस्थापन चालविले जाते. या ठिकाणी दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवासाची सोय करण्यात आली आहे.
  नवरात्रौत्सव काळात नऊ दिवस आणि रात्री विविध धार्मिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांची रेलचेल असते. तर मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येते. रात्रीच्या वेळी ही आरास पाहताना मन सुखावून जाते. दुपारी आरती, सांयकाळी नित्य धुपारती केली जाते. त्यानंतर प्रवचन, गायन आणि किर्तनाचा कार्यक्रम होऊन पालखीची मिरवणूक निघते. हा सोहळा नयनरम्य असतो. नवरात्र हा शक्तीच्या उपासनेचा आराधनेचा काळ, या काळात भाविकांनी ईशशक्तीची अनुभुती घेण्यासाठी एकदा तरी आवर्जुन  भेट द्यावी असेच हे श्री महाकाली स्थान आहे.
यावर्षी रविवार दि. ११ ऑक्टोबर ते मंगळवार दि. २० ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांनी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. उत्सव काळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. उत्सव काळात दररोज सकाळी ७ ते ११ या वेळात पूजापाठ, अभिषेक व महानैवैद्य, दुपारी ३ वाजता  घटाची आरती, सायं. ४ ते ५ वाजेपर्यंत राजापूर येथील ह. भ. प. विद्याधर करंबेळकर यांचे किर्तन, सायंकाळी ६.३० वाजता धुपारती, त्यांनतर रात्रौ ७ ते ८ या वेळात रत्नागिरी येथील वेदशास्त्र संपन्न श्री. ओंकार मुळये यांचे प्रवचन, रात्रौ ८ ते ९ या वेळेत सांगली येथील अभिषेक काळे यांचा गायन कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ९ ते  १०.३० या वेळेत पालखी प्रदक्षिणा होईल.
तर दररोजच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये पहिली माळ रविवार, ११ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय ढोलवादन स्पर्धा, दुसरी माळ सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी दशावतार-दुर्गाशक्ती, तिसरी माळ मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी श्री रवळनाथ रिमिक्स लयभारी नमन मंडळ रत्नागिरी यांचे बहुरंगी नमन तर चौथ्या माळेला बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी बुवा संदीप लोके (देवगड) विरुद्ध बुवा गुंडू सावंत (कुडाळ) असा डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे.
गुरुवार, १५ ऑक्टोबर पाचवी माळ रोजी  श्री आई जाखादेवी कलामंच, मुंबई (भालावली) यांचे नमनाचा कार्यक्रम तर सहावी माळ शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय सोलो डान्स व ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. सातवी माळ शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी मंगळागौर स्पर्धा तर आठवी माळ रविवार, १८ ऑक्टोबर रोजी कोकणचा साज संगमेश्वरी बाज (भाग दुसरा) सादर होणार आहे.
तर नवव्या माळेला सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी ऋषिकेश कदम (खेड) विरुद्ध देवेंद्र झिमन (लांजा) असा शक्ती-तुरा डबलबारी  सामना रंगणार आहे. मंगळवार २० ऑक्टोबर विजयादशमी दसरा महोत्सवाने उत्सवाची सांगता होणार आहे.
असे दहा दिवस मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान रविवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात घटस्थापनेचे पारंपारिक विधी होणार असल्याने या दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. तर  उत्सव  कालावधीत दररोज सायं. ६.३० ते रात्रौ ९.३० वाजेपर्यंत विविध पारंपारिक धार्मिक कार्यक्रमांमुळे देवीचे दर्शन बंद रहाणार असल्याचे श्री महाकाली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रसाद शेटये यांनी सांगितले.
तरी या नवरात्रौत्सवातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि श्री महाकाली मातेच्या दर्शनाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन ट्रस्टी, श्री महाकाली देवस्थान आडिवरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.