गुहागर येथील श्री वराती देवीचा शारदीय नवरात्रौत्सव उत्साहात सुरू; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गुहागर प्रतिनिधी

गुहागर खालचापाट येथील श्री वराती देवी मंदिरात शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा उत्सव रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ ते गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ (आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध पंचमी) या कालावधीत संपन्न होत आहे. उत्सवा दरम्यान दररोज सकाळी ७.०० वाजता देवीची षोडशोपचारे पूजा आणि सायं. ७.१५ वाजता महाआरती असे नित्य कार्यक्रम होणार आहेत.
या ५ दिवसांच्या महोत्सवात विविध धार्मिक विधी आणि लोककलांचे सादरीकरण होणार आहेत.
यामध्ये दिवस पहिला रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ पहिल्या दिवशी ‘भगवा’ रंगाचे प्राधान्य असून सायं. ८.०० वाजता उदमेवाडी ग्रामस्थ मंडळ, कोतळूक यांचे पारंपारिक जाखडीनृत्य होईल. तर रात्री १०.०० वाजता स्वयंप्रकाश गोयथळे भजन मंडळ, गुहागर खालचापाट यांचे सुस्वर भजन होईल.
वदिवस दुसरा सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ या दिवशी ‘पांढरा’ रंग असून सकाळी ९.०० वाजता कुंकूमार्चन आणि सकाळी ११.०० वाजता कुमारीका पूजन होईल. रात्री ८.०० वाजता श्री माऊली वरदानदेवी नृत्य कलापथक, रानवी यांचे जाखडीनृत्य आणि रात्री १०.०० वाजता श्री जांभळदेवी प्रा. भजन मंडळ, गुहागर-बाग यांचे भजन होईल.
दिवस तिसरा मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ ‘लाल’ रंगाच्या या दिवशी सकाळी ११.०० वाजता सप्तशती पाठ वाचन होईल. सायं. ४.०० वाजता श्री कलावती आई महिला भजन मंडळ, गुहागर, रात्री ८.०० वाजता श्री माऊली महिला भजन मंडळ, जानवळे आणि रात्री १०.०० वाजता श्री दत्त प्रा. भजन मंडळ, गुहागर वरचापाट यांची भजने सादर केली जातील.
दिवस चौथा बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ ‘निळा’ रंगाच्या या दिवशी सकाळी ११.०० वाजता सप्तशती हवन आणि पूर्णाहुती होईल. सायं. ५.०० वाजता स्वरसाधना महिला भजन मंडळ, गुहागर खालचापाट यांचे भजन, रात्री ८.०० वाजता कांचनस्वामी नृत्य कलापथक, असगोली हुंबरवाडी यांचे जाखडीनृत्य आणि रात्री १०.०० वाजता श्री दत्त प्रासादिक देवकर भजन मंडळ, आरे यांचे भजन होईल.
दिवस पाचवा गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ या दिवशी ‘पिवळा’ रंग असून सकाळी ७.०० वाजता श्रींची महापूजा आणि आवर्तने होतील. रात्री ८.०० वाजता श्री वराती देवीचा महाप्रसाद (भंडारा) आयोजित केला आहे. रात्री १०.०० वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, पालशेत आणि रात्री ११.०० वाजता श्री गंगामाता प्रा. बालमित्र मंडळ, कोंडकारूळ यांची भजने होतील.
या सर्व कार्यक्रमांचे नेटके नियोजन श्री. नितीन मधुकर गोयथळे (खोत) आणि श्री. अजित शांताराम मोरे (खोत) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी या नवरात्र उत्सवामध्ये सहभागी होऊन देवीच्या दर्शनाचा, महाआरतीचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.