आसगे गावातील सर्वसमावेशक नेतृत्व, लोककलेचा उपासक एकनाथ काशिराम मांडवकर त्यांचे निधन

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील आसगे गावातील सर्वसमावेशक नेतृत्व, लोककलेचा उपासक ,समाजाचे खंबीर मार्गदर्शक, निष्ठावंत कार्यकर्ते आणि सर्वांचे लाडके ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व एकनाथ काशिराम मांडवकर यांचे २ ऑक्टोबर रोजी वयाच्या ६० व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.
एकनाथ मांडवकर नवयुग सेवा मंडळ (मांडवकर वाडी) चे अध्यक्षपद गेली ३० वर्षे अतिशय समर्थपणे आणि निष्ठेने सांभाळले. या तीन दशकांच्या प्रदीर्घ काळात त्यांनी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना एकत्र आणून एकसंध बांधले. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा – तालुका लांजा चे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. बहुरंगी नमन’ ही लोककला टिकून राहिली पाहिजे, एवढेच नव्हे तर आजच्या नव्या पिढीने ती जोपासावी व पुढे न्यावी, यासाठी एकनाथ मांडवकर यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे एकनाथ मांडवकर हे कोणाच्याही अडीअडचणीला, एका हाकेवर धावून जाणारे, निस्वार्थी वृत्तीने कार्य करणारे आणि अन्यायाविरुद्ध नेहमी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. आज त्यांच्या जाण्याने आसगे गाव, लांजा तालुका आणि मुंबईतील समाजबांधवांचा एक भक्कम आधार कोसळला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.