सावंतवाडी बससेवेचा गोव्यापर्यंत विस्तार करण्याची मागणी; पर्यटन आणि प्रवासी वाहतुकीला मिळणार चालना
देवरूख (प्रतिनिधी)
रत्नागिरी विभागातील देवरूख आगाराची जुनी आणि प्रतिष्ठित देवरुख-सावंतवाडी बससेवा गोवा राज्याची राजधानी पणजीपर्यंत विस्तारित करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणारी तसेच खेड्यापाड्यांतील दुर्गम भागातून प्रवाशांना सेवा देणारी ही बस गेल्या अनेक वर्षांपासून ‘रत्नसिंधू एक्सप्रेस’* म्हणून प्रवाशांमध्ये परिचित आहे. काही कारणांमुळे गेली दोन वर्षे बंद असलेली ही सेवा आता पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाचे झालेले काम आणि सदर बसच्या कणकवली पासून जलद सेवेमुळे या बसच्या नियोजित प्रवासाच्या वेळेत सुमारे दीड तासांची बचत होत असल्याचे सांगितले जात आहे. या बदलाचा फायदा घेऊन देवरुख–सावंतवाडी बससेवा थेट पणजीपर्यंत सुरू केल्यास प्रवाशांना मोठी सुविधा मिळू शकते. त्यामुळे या मार्गाचा गोव्यापर्यंत विस्तार करण्याची मागणी पुढे येत आहे. तरुणांमध्ये गोव्याविषयी असलेले आकर्षण, तसेच अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेली श्री मंगेशी आणि श्री शांतादुर्गा मंदिरे यांमुळे देवरुख व परिसरातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होऊ शकते.* सध्या देवरुखहून गोव्याला जाण्यासाठी रेल्वे हा एक पर्याय असला, तरी जवळचे रेल्वे स्थानक सुमारे २५ किलोमीटर दूर असल्याने प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचणे आणि सामानासह प्रवास करणे अनेकदा गैरसोयीचे ठरते.
अशा परिस्थितीत देवरुखहून थेट पणजीपर्यंत एसटी बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. या प्रस्तावाचा फायदा केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर देवरुखच्या पर्यटनालाही होऊ शकतो. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना देवरुख आणि संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर, कर्णेश्वर, छत्रपती संभाजी महाराज स्मारक (कसबा), लिंगाचा डोंगर, महिमतगड आणि निसर्गरम्य देवनगरी देवरुख या पर्यटनस्थळांकडे आकर्षित करण्याची संधी मिळेल. गोवा आणि कोकण यांना थेट एसटी सेवेने जोडल्यास धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन आणि निसर्ग पर्यटनाला चालना मिळू शकते. परिणामी, स्थानिक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित घटकांनाही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
देवरुख-सावंतवाडी मार्गावरील प्रवासाच्या वेळेत झालेली बचत लक्षात घेता, सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या वेळापत्रकाचा अभ्यास करून बस पणजीपर्यंत विस्तारित करण्याच्या शक्यतेची तपासणी करणे आवश्यक आहे. या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद, अपेक्षित प्रवासी संख्या आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यासाठी देवरुख आगार आणि रत्नागिरी विभागीय कार्यालयाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून गोवा राज्यात आंतरराज्य बस वाहतूक करण्यासाठी आवश्यक परवानग्या व परमिट मिळविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. यामुळे कोकणातील प्रवाशांना गोव्यापर्यंत थेट बससेवेचा लाभ मिळेल, तसेच गोव्यातील पर्यटकांनाही देवरुख व परिसरातील पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. ‘रत्नसिंधू एक्सप्रेस’ला पणजीपर्यंत विस्तार मिळाल्यास कोकण आणि गोवा यांच्यातील प्रवासी वाहतूक अधिक सुलभ होण्याबरोबरच देवरुखच्या पर्यटन विकासालाही नवी दिशा मिळू शकते. त्यामुळे संबंधित एसटी प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













