मंडणगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील तुळशी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने, तांब्या-पितळेची भांडी आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, तुळशी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथील मूळ रहिवासी असलेले लखन परशुराम मोहिते (वय ३३) हे नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबासह पुणे येथे वास्तव्यास आहेत. सध्या ते हिंजवडी फेज १, पुणे येथे राहतात. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मोहिते यांच्या बहिणी घराची साफसफाई करण्यासाठी गेल्या असता, घराचा दरवाजा उघडा असल्याचे तसेच कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी लखन मोहिते यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष घरी येऊन पाहणी केली असता, अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याचे आणि आतील कपाटे उचकटून मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
या चोरीमध्ये अंदाजे ७० हजार रुपये किमतीचे सुमारे १५ ग्रॅम वजनाचे जुने सोन्याचे मंगळसूत्र, अंदाजे १ लाख रुपये किमतीचे सुमारे २० ग्रॅम वजनाचे जुने सोन्याचे मणी व इतर दागिने, तसेच अंदाजे ५ हजार रुपये किमतीची तांब्या-पितळेची भांडी असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी १० ऑक्टोबर २०२६ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत. घरफोडीच्या या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, बंद घरे लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.












