कणकवलीच्या महिला पोलीस हवालदार स्मिता माने यांचा मृतदेह जंगलात आढळला

दोन दिवसांपासून होत्या बेपत्ता

बिडवाडी-हुंबर्णे येथील घटना, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

कणकवली : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कणकवली पोलीस ठाण्याच्या महिला हवालदार स्मिता माने (पूर्वाश्रमीच्या स्मिता पवार) यांचा मृतदेह रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिडवाडी – हुंबर्णे येथील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

स्मिता माने आणि त्यांचे पती सचिन माने हे दोघेही कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सचिन माने हे कणकवली पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. या दोघांची नुकतीच वैभववाडी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्यामुळे ते लवकरच वैभववाडी येथे रुजू होणार होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास सचिन माने यांना स्मिता घरी दिसून आल्या नाहीत. त्यांनी त्यांचा शोध घेतला; मात्र त्या सापडल्या नाहीत. अखेर सचिन माने यांनी पत्नी स्मिता बेपत्ता असल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून स्मिता माने यांचा शोध सुरू होता. दरम्यान, रविवारी दुपारी बिडवाडी-हुंबर्णे येथील जंगलमय परिसरात स्थानिक ग्रामस्थांना एका महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान हा मृतदेह महिला हवालदार स्मिता माने यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच कणकवलीसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्मिता माने यांच्या मृत्यूच्या वृत्ताने पोलीस दलात शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.