बेदारकारपणे दुचाकी चालवून अपघात केला; जखमी मैत्रिणीला तिथेच टाकून गेला

 

युवकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी :बेदारकारपणे दुचाकी चालवून अपघात करत पाठीमागे बसलेल्या मैत्रिणीच्या दुखापतीस कारणीभूत झाल्याप्रकारणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची हि घटना शनिवार 19 ऑगस्ट रोजी रात्री 9 वा.सुमारास आयटीआय-भाजी मंडई ते मारुती मंदिर रस्त्यावर घडली.
फुजेल काझी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.
दुचाकीवरुन पडल्यानंतर जखमी अवस्थेत मैत्रिणीला तिथेच टाकून त्याने पलायन केले. त्याच्या विरोधात शशिकांत लक्ष्मण मोहिते ( ४०, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार, शनिवारी रात्री त्यांची मुलगी संशयित मित्र फुजेलच्या दुचाकीवरुन मागे बसून मारुती मंदिरहून येत असताना फुजेल याने दुचाकी निष्काळजीपणे चालवून आयटीआय -भाजीमंडई येथे अपघात केला. मागे बसलेली मोहिते यांची मुलगी रिया पडून जखमी झाली. तिच्या डोक्याला व उजव्या हाताला दुखापत झाली. तिला जखमी अवस्थेत तिथेच टाकून संशयित फुजेल काझी याने पलायन केले. या प्रकरणी शशिकांत मोहिते यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.