नाणीज शाळेत काव्य कार्यशाळेला उस्फुर्त प्रतिसाद

कोमसाप रत्नागिरी शाखेचे आयोजन

रत्नागिरी: कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेच्यावतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत नाणीज हायस्कुल येथे काव्य कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी निवृत्त प्राध्यापिका सौ. विशाखा सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी सौ. सकपाळ यांचा माजीविद्यार्थिनी म्हणून सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना साहित्याची ओढ लागावी. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा. त्यांच्यातून नवे बाल साहित्यिक तयार व्हावेत या हेतूने कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेच्यावतीने तालुक्यातील विविध शाळामधून कार्यशाळा घेतल्या जातात. या कार्यशाळेला जेष्ठ साहित्यिकांना निमंत्रित करुन ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यावेळी तालुक्यातील नाणीज हायस्कुल येथे काव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यशाळेत निवृत्त प्राध्यापिका सौ. विशाखा सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना साहित्याचे महत्व पटवून देत कवीता कशा कराव्यात, कविता कशा सुचतात, त्यांची मांडणी कशी असावी, प्रत्येक ऋतूमध्ये कविता कशा निर्माण होतात याचे सविस्तर विवेचन सौ.सकपाळ यांनी केले.

या कार्यक्रमाला रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष तेजा मुळ्ये , उपाध्यक्ष श्री.राजेंद्र कदम, कार्यकारिणी सदस्य श्री. मनोजकुमार खानविलकर , शाळेचे मुख्याध्यापक श्री.बनसोडे आणि जेष्ठ शिक्षिका सौ.रमा मुळ्ये उपस्थित होते. इयत्ता आठवी आणि नववी चे विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते.

या कार्यशाळेच्या मार्गदर्शनातून तयार कवितांचे सादरीकरण करण्याची संधी लवकरच कोमसाप रत्नागिरी शाखा नाणीज विद्यालयाच्या सहकार्याने उपलब्ध करून देणार असल्याचे शाखेच्या अध्यक्षा सौ.तेजा मुळ्ये यांनी सांगितले.