युवासेना सहसचिव प्रद्युम्न माने यांच्या पुढाकाराने साडवली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

६० हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

देवरूख (प्रतिनिधी):

युवासेना संगमेश्वर तालुका, नॅब आय हॉस्पिटल चिपळूण आणि प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली (NSS व UBA विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब, गरजू व वयोवृद्ध रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री श्री. रवींद्रजी माने यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

हे शिबिर युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव श्री. प्रद्युम्न रवींद्र माने यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ६० पेक्षा जास्त रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरादरम्यान नॅब आय हॉस्पिटल, चिपळूण येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. संगीता खरात यांनी रुग्णांची सखोल नेत्रतपासणी केली. तपासणीनंतर पुढील उपचारांसाठी रुग्णांचे वर्गीकरण करण्यात आले असून पात्र रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया, औषधोपचार, तसेच राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था पुरविली जाणार आहे.

या उद्घाटनप्रसंगी व कार्यक्रमास दिव्यांग मित्र श्री. संदीप नलावडे, समाजसेविका सौ. रेवा कदम, कै. सौ. मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवलीचे मुख्याध्यापक श्री. बळवंत नलावडे तसेच इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे उपस्थित होते.
विशेष म्हणजे, या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्ष बी. फार्म (Final Year B. Pharm) मधील दिव्यांग विद्यार्थी श्री. वाहिब कडवईकर (Mr. Wahib Kadwaikar) याने विशेष परिश्रम घेऊन मोलाचे योगदान दिले. त्याच्या या सामाजिक बांधिलकीचे व उत्साहाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे NSS समन्वयक श
प्रा. प्रशील चरकरी, NSS सह-समन्वयक प्रा. वैष्णवी दुडये, UBA समन्वयक प्रा. वैष्णवी नलावडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले. ग्रामीण भागातील गरजूंसाठी राबवलेल्या या आरोग्य सेवेबद्दल लाभार्थी रुग्णांनी व स्थानिक नागरिकांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले