देवरूखमधील अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलचा रौप्यमहोत्सवी दिमाखदार सोहळा संपन्न

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल, देवरुखचा रौप्यमहोत्सव उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या पंचवीस वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत, या प्रवासात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चितळे बंधू मिठाईवाले यांचे श्री. श्रीकृष्णजी चितळे आणि चितळे डेअरीचे संचालक श्री. गिरीशजी चितळे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिक रंगत आली.

रौप्य महोत्सव सोहळ्याला व्यासपीठावर संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, श्री. बाळासाहेब जोशी आणि संस्था पदाधिकारी, शिक्षणाधिकारी श्री.साळुंखे साहेब, पाध्ये स्कूलच्या समिती अध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्रशालेचे सीईओ नितीन शेडगे आणि पदाधिकारी, मुख्याध्यापिका सोनाली नारकर व दिक्षा खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थापनेपासून ते आजपर्यंत शाळेच्या प्रगती व विकासासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येऊन, कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी चितळे बंधूं व उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी आपल्या मनोगतात शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून, सामाजिक जाणीव, सामाजिक ऋण जपत कार्य करणे, संवेदनशीलता, व्यवहार चतुरता , विद्यार्थ्यांचा भावनिक व सामाजिक विकासासह मूल्यांचा विकास महत्वाचा असल्याचे याप्रसंगी नमूद केले. संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन अनघा आठल्ये यांनी केले. कृतज्ञतेचा सन्मान, यशस्वी वाटचालीचा गौरव आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प अशा त्रिवेणी संगमात पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूलचा रौप्यमहोत्सव उत्साहात साजरा झाला.