मसुरे | झुंजार पेडणेकर
श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत ‘जागतिक छायाचित्रण दिन’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये टिपलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन कला दालनात भरवण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
छायाचित्रण कलेचा इतिहास, तिचे समाजातील महत्त्व आणि निसर्ग व संस्कृती जतन करणे याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यातील निरीक्षणशक्ती व सर्जनशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदर्शनातील विजेत्या छायाचित्रांचे परीक्षण शिक्षिका वेदिका दळवी व प्रतिभा केळुसकर यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत आर्या रामचंद्र भांडे हिने प्रथम, निधी निनाद धारपवार हिने द्वितीय तर सिया सचिन पाताडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ सिद्धी भरत पालव, नेहा नामदेव वरक आणि श्रवण महेश सावंत यांना गौरविण्यात आले.
या उपक्रमाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व सहभागी आणि विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.













