अंजनवेल समुद्रात पडून जहाज कर्मचाऱ्याचा मृत्यू

गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील अंजनवेल येथील कोकण एलएनजी कंपनीच्या जेटीजवळ समुद्राच्या पाण्यात पडल्याने जहाजावरील २२ वर्षीय प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. राहुल कुमार लालसाहेब यादव (वय २२, रा. शरीफपूर, शिखिरखुर्द, ता. हंडिया, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यादव हा २३ सप्टेंबरपासून ओशन स्पार्कल कंपनीच्या ‘ओशन स्वान-१’ जहाजावर
प्रशिक्षणार्थी होता. शनिवारी एलएनजी गॅस घेऊन आलेल्या ‘पोलारिस’ जहाजाला जेटीवर सुरक्षितपणे आणण्यासाठी ‘ओशन स्वान-१’ जहाजावरील कर्मचारी निघाले होते. त्यानंतर पांच मिनिटांनी राहुल यादव पाण्यात पडल्याची माहिती जहाजावरील कर्मचाऱ्यांनी दिली.
राहुल समुद्राच्या पाण्यात तरंगताना दिसला. त्याला स्पीड बोटीने जेटीवर आणले व रुग्णवाहिकेने अंजनवेल आरजीपीपीएल मेडिकल सेंटरमध्ये आणले. मात्र डॉक्टरांनी दुपारी १.५७ वाजता त्याला मृत घोषित केले.