आंगणेवाडी ग्रामस्थांच्या एकजुटीतून जलसंधारणाची दिशा!

▪️पाणी अडवा – पाणी जिरवा, गाव समृद्ध करा…!

मसुरे | झुंजार पेडणेकर 

पुढील येणाऱ्या काळातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी वाहून जाणारे पाणी अडविणे आणि बंधारे बांधणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. मालवण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आंगणेवाडी गावामध्ये पाणथळ ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदान करत बांध घालून पाणी अडविण्याचा एक स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जागेवरच अडवून त्याचा उपयोग गावातील आगामी पाणीटंचाई कमी करण्यासाठी होणार आहे. तसेच, भविष्यात भूजल पातळी वाढण्यासाठीही या जलसंधारणाच्या कामामुळे मोठी मदत मिळणार आहे.

या सामाजिक आणि दूरगामी उपक्रमासाठी आंगणेवाडीमधील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे आणि श्रमदानामुळे दुष्काळाच्या संकटाशी सामना करण्यासाठी एक आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे. आंगणे कुटुंबियांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.