बाप-लेकानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या पत्नीचेही रुग्णालयात निधन

सोनुर्लीतील जाधव कुटुंबाचा दुर्दैवी अंत ; गावावर शोककळा

​सावंतवाडी:
म्हापसा-करासवाडा येथील भाड्याच्या खोलीत शनिवारी सकाळी सोनुर्ली येथील अजय देऊ जाधव आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा अथर्व यांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेत गंभीर अवस्थेत सापडलेली अजय यांची पत्नी सुवर्णा जाधव (वय ३०) हिची गोव्यातील गोमेकॉ रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर मंगळवारी दुपारी अपयशी ठरली. उपचारादरम्यान तिचेही निधन झाल्याने हसतेखेळते जाधव कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

​दरम्यान, रविवारी दुपारी अजय आणि चिमुकल्या अथर्व या बाप-लेकाच्या मृतदेहावर सोनुर्ली येथील जाधववाडीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मूळचे सोनुर्ली येथील रहिवासी असलेले अजय जाधव हे नोकरीनिमित्त गेली वर्षभर म्हापसा-करासवाडा येथे पत्नी व मुलासह भाड्याच्या खोलीत राहत होते. शनिवारी सकाळी त्यांची खोली बंद अवस्थेत होती. संशय आल्याने तपास केला असता अजय आणि अथर्व या दोघांचे मृतदेह आढळून आले, तर सुवर्णा ही अत्यवस्थ स्थितीत बाजूलाच पडलेली आढळली होती.
​रविवारी दुपारी बाप-लेकाचे मृतदेह सोनुर्ली येथील जाधववाडीतील घरी आणताच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. चिमुकल्या अथर्वचा निष्प्राण देह पाहून उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पाणावले आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

​सामूहिक आत्महत्या की घातपात?
अजय जाधव हे सुशिक्षित असून एका खासगी बँकेत नोकरीला होते. त्यांचे राहणीमान उत्तम होते आणि कुटुंबात कधीही वादाचे प्रसंग नसल्याचे समजते. त्यामुळे जर त्यांनी सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतला असेल, तर त्यामागे नक्की काय कारण होते? की हा घातपाताचा प्रकार आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

​या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी आणि मृत्यूशी झुंज देणारी पत्नी सुवर्णा हिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असती, तर या संपूर्ण घटनेमागील रहस्य उलगडले असते.

मात्र, मंगळवारी दुपारी तिचेही निधन झाल्यामुळे या मृत्यूचे कोडे सोडवणे म्हापसा पोलिसांसमोर आता मोठे आव्हान बनले आहे. म्हापसा पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी कसे पोहोचतात आणि तपास कशा प्रकारे पुढे नेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.