कामाचा दर्जा आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याबाबत सूचना
मालवण | प्रतिनिधी : पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मालवण येथील चिवला बीच रस्त्याच्या दुरुस्ती अंतर्गत काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीतून संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या सुरू असलेल्या कामाची नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासन आणि ठेकेदार एजन्सीला आवश्यक सूचना दिल्या.
रस्त्याचे काम नियमानुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार येता कामा नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी यावेळी दिले. काँक्रिटीकरण करताना काँक्रीट मिक्सर आणि काँक्रिटीकरणाची लेव्हल मशीन यांसारख्या उपकरणांचा वापर केला जात आहे. याचीही पाहणी त्यांनी केली.
रस्त्यावर पावसाचे पाणी साचू नये आणि पाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी योग्य उतार ठेवावा. तसेच पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक ठिकाणी होलपासची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. रस्त्याचे काम पूर्ण करताना तांत्रिक बाबींची पूर्तता करून दर्जा आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.
यावेळी नगराध्यक्षांनी सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाकडून ही कामाच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली.













