स्मिता माने मृत्यू प्रकरणातील गूढ वाढले
स्मिता यांचा मोबाईल घरातच, शाळेत गेल्याचा घटनाक्रम आणि अनेक प्रश्न अनुत्तरित
कणकवली : महिला पोलीस हवालदार स्मिता सचिन माने यांच्या मृत्यू प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत असून, आता त्यांचे पती सचिन माने यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. स्मिता यांचा मृतदेह आढळून आला, त्याच दिवशी सचिन माने यांनी व्हॉट्सॲपवर ‘मी खूप चुकलो, ये परत… बाबू आजारी आहे, तो वाट बघतोय, परत ये’ असा भावनिक मजकूर स्टेटसला ठेवल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, स्मिता यांचा मोबाईल घरातच असल्याची बाब आणि त्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी खरोखरच गेल्या होत्या का, याबाबत उपस्थित होणारे प्रश्न यामुळे प्रकरणातील संशय अधिक गडद होत आहे.
स्मिता माने या ९ ऑक्टोबरपासून कलमठ येथील राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर रविवार, ११ ऑक्टोबर रोजी बिडवाडी-हुंबरणे येथील गांगेश्वर मंदिराच्या मागील जंगलमय परिसरात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यातच मृतदेह सापडलेल्या दिवशी पती सचिन माने यांनी ठेवलेल्या कथित व्हॉट्सॲप स्टेटसमुळे या प्रकरणाची चर्चा आणखी तीव्र झाली आहे. दरम्यान, सचिन माने यांनी दिलेल्या फिर्यादीतील घटनाक्रम आणि स्मिता यांचा मोबाईल घरातच असल्याची बाब यांचाही तपासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विचार होणे आवश्यक आहे. स्मिता या मुलाला शाळेत सोडण्यासाठी खरोखरच घराबाहेर पडल्या होत्या का? त्या शाळेत गेल्या असल्यास कोणत्या वाहनाने गेल्या होत्या? त्यांच्या शाळेत जाण्याबाबत काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे का? तसेच त्या घरातून बाहेर पडल्याचा नेमका घटनाक्रम काय होता? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
स्मिता यांच्या बहिणी रेश्मा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत पती सचिन माने यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ तसेच मारहाण होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. याशिवाय, मुलाने सांगितलेली माहितीदेखील फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. या तक्रारीतील आरोप आणि संशयाच्या आधारे पोलिसांनी सचिन माने याला अटक केल्याची माहिती आहे.
एकीकडे स्मिता यांचा जंगलात आढळलेला मृतदेह, दुसरीकडे पतीचे कथित भावनिक व्हॉट्सॲप स्टेटस, घरातच राहिलेला मोबाईल आणि स्मिता यांच्या घरातून बाहेर पडण्याबाबतचा अनुत्तरित घटनाक्रम, यामुळे या प्रकरणातील गूढ कायम आहे. स्मिता यांचा मृत्यू आत्महत्या आहे की त्यामागे घातपात आहे, याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या सखोल तपासातूनच होऊ शकतो. या प्रकरणातील प्रत्येक दुव्याची पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.













