महिला पोलीस हवालदार मृत्यू प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा; तपास सुरू

तपासी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची माहिती

कणकवली : महिला पोलीस हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यू प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मृत महिला आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. महिलेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या गुन्ह्यात आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक पुरावे व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. मृत महिलेचा विसेरा राखून ठेवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालातून अद्याप स्पष्ट निष्कर्ष प्राप्त झालेला नाही. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल कोल्हापूर येथे इन-कॅमेरा पद्धतीने सादर करण्यात आला असून, तो अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील तपास करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा कुडाळ पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.