देवरूख-रत्नागिरी मार्गावर उद्यापासून विनावाहक जलद बससेवा सुरू होणार

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख आगाराच्यावतीने प्रवाशांच्या सोयीसाठी देवरूख-रत्नागिरी मार्गावर उद्या बुधवारपासून विनावाहक जलद बस सेवा सुरू करण्यात येत आहे. या सेवेमुळे देवरूख ते रत्नागिरी प्रवास अधिक जलद व वेळेत होणार आहे.

या जलद सेवेसाठी मर्यादित बसथांबे ठेवण्यात आले आहेत. या बस सेवेसाठी निवे तुळसणी, पांगरी, हातखंबा इतकेच थांबे ठेवण्यात आले असून या थांब्यांवरच बस थांबणार आहे. त्यामुळे इतर बसथांब्यावर वेळ न जाता बस थेट रत्नागिरीकडे रवाना होणार आहे. देवरूख आगारातून सकाळी ७ वा, ११.३० वा व दु. ३.४५ वा. बस सुटणार असून रत्नागिरीतून सकाळी ९ वा, दु. १.१५ वा. व सायंकाळी ६ वा. बस सुटणार आहे.

विनावाहक म्हणजेच कंडक्टर विरहीत ही बससेवा असणार आहे. प्रवाशांनी तिकीटाबाबत सहकार्य करावे, असे आवाहन देवरूख आगारव्यवस्थापक यांनी केले आहे. नोकरदार, विद्यार्थी व व्यापारी वर्गाला या बससेवेचा मोठा फायदा होणार असून प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवरूख आगारातर्फे करण्यात आले आहे. याचबरोबर देवरूख-भांबेड- राजापूर मार्गे सावंतवाडी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस दु. १ वा. देवरूख आगारातून सुटते. तर सावंतवाडीवरून सकाळी ५ वा. सुटते. या बससेवेचाही प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.