गुहागर प्रतिनिधी:
गेल्या साडेतीन वर्षांमध्ये गुहागर तालुक्यात प्रशासकीय कारभार काळात जलसंधारणच्या तब्बल ४० बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. मात्र त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने आता खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सभापती यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा सुरू केला आहे. या पाहणीत बारकाईने व सखोल चौकशी करण्यात येत असल्याने अनेकांचे कान टवकारले आहेत.
गेली चार वर्षे गुहागर पंचायत समितीमध्ये प्रशासकीय कारभार सुरू होता. अशामध्येच गेल्या साडेतीन वर्षात तालुक्यात जलसंधारण अंतर्गत तालुक्यात ठिकठिकाणी तब्बल ४० बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. नदीमधील अडवलेल्या पाण्यातून जमिनीच्या पाणी क्षमतेचा पोत वाढवण्याचा उद्देश समोर ठेवत ही मोहीम राबवण्यात आली. लाखो रुपये खर्चुन करण्यात आलेली ही कामे दर्जेदार आहेत का, असे सवाल तालुक्यातून काही ठिकाणांवरून उठत होते.
मात्र पंचायत समितीने मासिक सभेत या विषयाला बगल देत थेट जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे,उपाध्यक्ष विलास चाळके, पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर व त्या-त्या जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य यांचा सहभाग घेत थेट पाहणी दौरा आखला आहे. या ‘टीम’ कडून जिल्हा पातळीवरून येऊन थेट क्षेत्र बंधाऱ्यांची पाहणी केली जात असल्याने या मोहिमेला वजन प्राप्त झाले आहे. पाहणीवेळी जलसंधारण विभाग चिपळूणचे अधिकारी कारंडे यांचीही उपस्थिती लाभत आहे.
तालुक्यात पंचायत समिती पातळीवर आत्तापर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षांचा मोठा कोणताही कार्यक्रम झालेला नाही. अशा स्थितीत तालुक्यातील झालेल्या या कामांची पाहणी केली जात असल्याने अनेकांचे लक्ष याकडे लागले आहे.
या पाहणी मोहिमेतून होणाऱ्या चौकशीत या बंधाऱ्यांमुळे नक्की किती फायदा झाला याची आकडेवारी पुढील काळात समोर येणार असल्याने अनेकांचे कान टवकारले आहेत. आतापर्यंत अनेक बंधाऱ्यांची पाहणी करण्यात आली असून छोट्या-छोट्या नदीवरील बंधाऱ्यांचीही पाहणी केली जाणार आहे.












