देवरूख (प्रतिनिधी):
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली येथे भारत निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण–२०२६’ उपक्रमांतर्गत विशेष मतदार नोंदणी शिबिर आणि मतदार जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल ब. खाडे यांनी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले मतदानाचे कर्तव्य बजावले पाहिजे. हे कर्तव्य जबाबदारीने पार पाडण्यासाठी पात्र ठरताच आपले मतदार ओळखपत्र काढून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र तरुणाने मतदार यादीत नाव नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये मतदार नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया, मतदार यादीतील नोंदींची पडताळणी तसेच मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीतील सहभाग यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती देवरुखचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. अक्षय पाटील, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. सुनील लोंढे, देवरुख तहसील कार्यालयाच्या मंडळ अधिकारी श्रीमती. संयोगिता बावणे आणि साडवलीचे बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) श्री. सागर बडेकर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसंदर्भातील विविध अर्जांविषयी माहिती देऊन प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. निवडणूक साक्षरता क्लबचे समन्वयक प्रा. गणेश प्र. तुळसणकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले. “माझा मतदार, माझा हक्क” हा संदेश देत महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मतदार नोंदणी पूर्ण केली. लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.













