नवदुर्गा युवा मंडळाच्या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
फोंडाघाट : नवदुर्गा युवा मंडळ, नवीन कुर्ली यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६ निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, यावेळी एकूण २८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने मंडळाने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान हे श्रेष्ठदान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.
रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, वैद्यकीय पथकाचे आणि सहकार्यकर्त्यांचे नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, उपाध्यक्ष मंगेश मडवी, सचिव अतुल डऊर, खजिनदार अमित दळवी, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, वैद्यकीय अधिकारी सिंधुदुर्ग उन्नती लडकत,
डॉक्टर संचित खटावकर, अविनाश चव्हाण, दीपक शिंदे, आशिष पेडणेकर, शिवराम राणे,
सचिन साळसकर, विजय आग्रे, राजेश हूंबे, मुन्ना जाधव इतर मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक जाणीव जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे…..













