वैभववाडी येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन 

‘नवरात्रीतून महिला व बालकल्याण योजनांचा जागर’ उपक्रमाचे केले कौतुक

वैभववाडी l प्रतिनिधी :वैभववाडी येथील दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दुर्गामातेचे दर्शन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांनी घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘नवरात्रीतून महिला व बालकल्याण योजनांचा जागर’ या उपक्रमाचे कौतुक केले.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथील दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

याप्रसंगी तहसीलदार सूर्यकांत पाटील, पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी माने मॅडम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, सचिव संजय रावराणे, उपाध्यक्ष संजय सावंत, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शांताराम काका रावराणे तसेच मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.