कोंडये सुवरेवाडी येथे बिबट्याचा थरार; कोंबड्यांच्या खोलीचा दरवाजा उघडताच बिबट्याची थेट महिलेवर झेप; महिला थोडक्यात बचावली

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील कोंडये सुवरेवाडी येथे थरारक घटना घडली आहे. कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने दुसऱ्या दिवशी दुपारी दरवाजा उघडताच थेट बाहेर झेप घेतली. या अचानक झालेल्या हल्ल्यात बिबट्याचे नख मीना धोंडू सुवरे यांच्या चेहऱ्याला लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. सुदैवाने मीना सुवरे यांचा जीव बालंबाल वाचला असून, या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

सुवरे यांच्या घराशेजारीच कोंबड्यांसाठी एक भक्कम चिरेबंदी खोली बांधण्यात आली आहे. नेहमीच्या सवयीनुसार संध्याकाळी अंधार पडल्यानंतर कोंबड्या स्वतःहून या खोलीत जातात आणि त्यानंतर घरातील मंडळी दरवाजा बंद करतात. घटनेच्या दिवशी संध्याकाळी दरवाजा बंद करण्यापूर्वीच एक बिबट्या छुप्या मार्गाने या खोलीत शिरला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.बिबट्या आत असल्याचे लक्षात न आल्याने घरातील सदस्यांनी नेहमीप्रमाणे बाहेरून दरवाजा लावून घेतला. त्यामुळे बिबट्या रात्रभर त्या चिरेबंदी खोलीतच बंदिस्त राहिला. रात्रभराच्या या मुक्कामात बिबट्याने खोलीतील सर्व कोंबड्यांच्या रक्तावर ताव मारलायात कोंबड्या ठार झाल्या . परंतु, खोलीत बिबट्या असल्याचा किंचितही संशय घरातील कोणाला आला नाही.

दुसऱ्या दिवशी दुपारी मीना धोंडू सुवरे या नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे कोंबड्यांना बाहेर सोडण्यासाठी आणि कामासाठी खोलीचा दरवाजा उघडायला गेल्या. दरवाजा उघडताच नेहमीप्रमाणे कोंबड्या बाहेर येतील, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.समोर कोंबड्यां ऐवजी रात्रभर बंदिस्त असलेला आणि बाहेर पडण्यासाठी व्याकुळ झालेला बिबट्या दबा धरून उभा होता. मीना यांनी दरवाजा उघडताच बिबट्याने सुटका करून घेण्यासाठी थेट बाहेरच्या दिशेने भीषण झेप घेतली. या धावपळीत बिबट्याचा पंजा आणि नख मीना यांच्या चेहऱ्याला घासून गेल्याने त्या जखमी झाल्या. अवघ्या काही सेकंदांत घडलेल्या या प्रसंगाने मीना यांची घाबरगुंडी उडाली. सुदैवाने बिबट्याने पुन्हा हल्ला न करता जंगलाच्या दिशेने पळ काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

या अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या मीना धोंडू सुवरे यांना स्थानिकांनी तात्काळ नजीकच्या फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्यांच्या चेहऱ्यावरील जखमेवर तातडीने वैद्यकीय उपचार केले तसेच आवश्यक ते प्राथमिक उपचार देऊन त्यांना धक्क्यातून सावरण्यास मदत केली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच सुवरेवाडी परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. घराच्या अगदी शेजारी असलेल्या चिरेबंदी खोलीत बिबट्या रात्रभर लपून राहू शकतो, या कल्पनेनेच सर्वजण हादरले आहेत. परिसरातील जनावरांचे गोठे, कोंबड्यांच्या खोल्या आणि आडोशाच्या जागांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, महिला व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात असा जीवघेणा प्रसंग पुन्हा कोणावरही येऊ नये, यासाठी वनविभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावावा, गस्त वाढवावी आणि ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी सुवरेवाडीतील ग्रामस्थांकडून केली जात आहे.