निवृत्त सीआरपीएफ जवान तुषार काळसेकर यांचे निधन

पत्रकार तेजस्वी काळसेकर यांना पतीवियोग; पत्रकार क्षेत्रातून शोक व्यक्त

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

 

मालवण तालुक्यातील काळसे येथील मूळ रहिवासी आणि सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथे वास्तव्यास असलेले निवृत्त सीआरपीएफ जवान तुषार श्रीराम काळसेकर (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने काळसेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पत्रकार क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होत आहे.

तुषार काळसेकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार श्रीमती तेजस्वी तुषार काळसेकर यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीआरपीएफ दलात सेवा बजावताना त्यांनी आपल्या शांत, मनमिळावू आणि शिस्तप्रिय स्वभावाने सहकाऱ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच जिल्ह्यातील पत्रकारांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने काळसेकर कुटुंबीयांसह परिचितांमध्ये दुःख व्यक्त होत आहे.