तालुक्यातील पिक नुकसानीचे सरसकट पंचनामे करा
आमदार प्रमोद जठार यांच्या प्रशासनाला सुचना
भाजपा पदाधिकाऱ्यानी वाडीवस्तीवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे आवाहन
राजापूर प्रतिनिधी : राजापूर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहिर झालेला आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संटक लक्षात घेता प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ योग्य प्रकारे नियोजन करावे. तसेच भातपिकासह अन्य पिकांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करा अशा सुचना विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी प्रशासनाला दिल्या.
बुधवारी आ. जठार यांनी राजापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिचा आढावा घेण्यासाठी राजापूर तहसीलदार कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला उपसभापती अभिजित गुरव, तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी रोहित कुंभार यांसह प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आ. जठार यांनी कोकणात दुष्काळ पडलाय हे कोणालाही पटत नाही, कारण कोकण म्हणजे हिरवेगार हेच लोकांना माहिती आहे, मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे आज ही दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे. या दुष्काळाच्या संकटातुन संधी शोधताना पाण्याच्या नियोजनाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले पाहिजे, यासाठी प्रशासनाने नियोजन केले पाहिजे, सध्याची परिस्थिती काय आहे यासाठी पाण्याचे ऑडिट केले पाहिजे. भविष्यातील टंचाईवर मात करण्यासाठी कशा प्रकारे उपायायोजना करायची आहे त्याचे नियोजन करून तसे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत असे आवाहन आ. जठार यांनी केले आहे. टंचाईनिवारणार्थ निधी कमी पडणार नाही, लागलाच तर आपण आपल्या आमदार निधीतुन निधी उपलब्ध करून देऊ, मात्र राजापूर तालुक्यातील कोणतेही गाव, वाडी वस्तीवर पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
तर तालुक्यातील १४ धरणांतील पाणीसाठा व नियोजन करतानाच भविष्यात या धरणांच्या माध्यमातुन कालवे काढून लगतच्या गाव व वाडयांना कसे पाणी देता येईल याचाही आराखडा तयार करा अशा सुचना त्यांनी जलसंपदा विभागाला केल्या.
तर भातपिकासह अन्य पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा, शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन करा, सरसकट पंचनामे करा, एकही शेतकरी मदतीपासून वंचित रहाणार नाही याची खबरदारी घ्या अशा सुचनाही आ. जठार यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.
यावेळी प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व उपसभापती अभिजित गुरव यांची प्रतिनिधी म्हणून निवड करत असल्याचे नमुद करत आ. जठार यांनी तालुक्यातील जनतेने तसेच प्रशासनेही गुरव यांच्याशी संवाद साधावा असे आवाहन केले. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी नियोजन करून प्रत्येक गावात भेटी द्याव्यात आणि पुढील आठवडा भरात एक अहवाल तयार करावा असेही आ. जठार यांनी सांगितले.
महिला आघाडीच्या शीतल पटेल व माजी नगरसेवक नागेश शेटये यांन शहरातील पाणीटंचाई नियोजन व उपाययोजनांबाबत काय करण्यात आले आहे याची माहिती मागितली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी शहरात पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या आराखडयाबाबत माहिती दिली. तर कोंडयेचे संतोष धुरत यांनी देखील कोंडये येथे महामार्गाच्या कामात कालव्याचे नुकसान झाले असून अद्याप त्याबाबत कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले. यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना आ. प्रमोद जठार यांनी दिल्या. संदीप तेरवणकर यांनी धोपेश्वर गाव हे देवस्थान इनाम असून विधंन विहिरीसाठी संमती घेताना अडचण येत असल्याचे सांगितले. यावर तात्काळ तेथील प्रशासकांडून संमती घ्याव व आवश्यक तेथे विंधन विहिर द्या असे आ. जठार यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत लिंगायत, नाटे सरपंच संदीप बांदकर, संदीप तेरवणकर यांसह उपस्थितांनी आपले प्रश्न मांडले.
तहसीलदार गंबरे यांनी प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेला आराखडा व झालेले पंचनामे याबाबत माहिती दिले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनीही आपले प्रश्न मांडले.
या बैठकीला भाजपा तालुका अध्यक्ष मोहन घुमे, एड. एकनाथ मोंडे, नगरसेविका सुयोगा जठार, माजी तालुका अध्यक्ष सुरेश गुरव आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.













