स्वीडनचे निकेलं आणि जॉन यांची खेडमध्ये हजेरी; ‘नमो दांडिया २०२६’ ठरले परदेशी पाहुण्यांसाठी आकर्षण!

भाजप नेते वैभव खेडेकर यांच्याकडून मराठमोळ्या पद्धतीने स्वागत; आंबा भवानी मातेचे घेतले दर्शन

खेड (प्रतिनिधी) : स्वीडनमधून भारतदर्शनासाठी आलेले निक आणि जॉन हे दोन परदेशी पाहुणे रिक्षातून भारतभ्रमंती करत खेडमध्ये दाखल झाले असून, त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि राजवैभव प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ‘नमो दांडिया उत्सव २०२६’ला भेट दिली. भाजप नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या दोघांना उत्सवासाठी आमंत्रित केले होते. परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
भारतदर्शनाच्या प्रवासादरम्यान खेडमध्ये आलेल्या निकेल आणि जॉन यांनी शहरातील कोकणी डाईन या रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठी थांबा घेतला. यावेळी वैभव खेडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. परदेशी पाहुण्यांचा मराठमोळ्या पद्धतीने हार घालून सन्मान करण्यात आला. भारतीय संस्कृती, मराठी परंपरा आणि येथील पाहुणचाराची ओळख परदेशी नागरिकांना व्हावी, या उद्देशाने त्यांना नमो दांडिया उत्सवासाठी आमंत्रित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेचा उल्लेख करत वैभव खेडेकर यांनी भारतात येणारा प्रत्येक पाहुणा हा आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याची भावना जपली पाहिजे, असे सांगितले. आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा परदेशी पाहुण्यांना समजाव्यात, तसेच मराठी संस्कृतीचा परिचय सातासमुद्रापार पोहोचावा, हा या स्वागतामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी निकेल आणि जॉन यांनी ‘आंबा भवानी मातेचा जयघोष’ केला. तसेच नमो दांडिया उत्सवाच्या ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या आंबा भवानी मातेचे पूजन करून देवीचे दर्शन घेतले. भारतातील धार्मिक परंपरा, उत्सवांचे सांस्कृतिक महत्त्व आणि मराठी माणसाचा पाहुणचार अनुभवण्याची संधी या भेटीतून त्यांना मिळाली.
रिक्षातून भारतभ्रमंती करणाऱ्या या परदेशी पाहुण्यांचे खेडमध्ये करण्यात आलेले स्वागत हे भारतीय संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रतीक ठरले. ‘नमो दांडिया उत्सव २०२६’च्या माध्यमातून मराठी संस्कृतीची ओळख परदेशी पाहुण्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. निक आणि जॉन यांच्या भेटीमुळे खेडमधील या उत्सवाच्या आकर्षणात आणखी भर पडली.