ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना यश
राजन लाड | जैतापूर
गेल्या रविवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी खाडी दुर्घटनेतील बेपत्ता मुलगी माहिरा हिचा मृतदेह अखेर पाच दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे.
रविवारी दुपारी खाडीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यापैकी तिघांचे मृतदेह आधीच सापडले होते, मात्र माहिरा हिचा शोध लागत नव्हता. तेव्हापासूनच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून माहिराचा शोध घेण्यासाठी दिवसरात्र अथक परिश्रम आणि प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती.
आज सकाळी नेहमीप्रमाणे सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान सकाळी साडेआठच्या सुमारास इंगळवाडी परिसरातील वाघोटण खाडीच्या कांदळवनात काही लोकांना तीव्र दुर्गंधी जाणवली. तिथे जाऊन पाहणी केली असता कांदळवनाच्या झाडीत माहिराचा मृतदेह आढळून आला.
ग्रामस्थ आणि यंत्रणेने तत्काळ मृतदेह ताब्यात घेतला असून सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा केली जात आहे. वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर उत्तरीय तपासणी पूर्ण करून दफनविधीसाठी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाणार आहे.












