दहावी कॉपी प्रकरणात मुख्याध्यापक संजय राठोड अटकेत; न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राठोड पोलिसांसमोर हजर

वैभववाडी प्रतिनिधी :
भुईबावडा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी तथा उंबर्डे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कणिराम राठोड याला वैभववाडी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणी मुख्याध्यापक संजय राठोड, हेत हायस्कूलचे शिक्षक संजयकुमार आडे आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकण विभागीय मंडळाच्या चौकशीनुसार, दहावीच्या परीक्षेदरम्यान संशयित संजय राठोडने आपल्या मुलाला अधिक गुण मिळावेत या उद्देशाने राठोड आणि रिलीव्हर पर्यवेक्षक आडे यांनी परीक्षार्थीच्या वर्गाबाहेरून अज्ञात व्यक्तीने लिहिलेल्या उत्तरांच्या पुरवण्या वर्गातील पर्यवेक्षकांकडे देऊन त्या उत्तरपत्रिकेला जोडण्यास सांगितल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात वैभववाडी गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार २२ जून रोजी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर गेल्या २३-२४ दिवसांपासून पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत होते. मात्र ते पोलिसांच्या संपर्काबाहेर होते.

दरम्यान, संजय राठोड यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन न्यायालयाने मंगळवारी त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर बुधवारी राठोड स्वतःहून वैभववाडी पोलीस ठाण्यात हजर झाले. गुरुवारी त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

या प्रकरणातील दुसरे आरोपी संजयकुमार आडे यांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांनी तो अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. आता ते स्वतःहून पोलिसांसमोर हजर होतात की पोलिसांना त्यांचा शोध घ्यावा लागतो, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अद्याप अज्ञात असून राठोड व आडे यांच्या चौकशीतून उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या त्या व्यक्तीची ओळख स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मुख्य आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्याने या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींची भूमिका, तसेच गुन्ह्याची व्याप्ती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आणखी काही जणांविरुद्धही गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव करीत आहेत.

दरम्यान, या कॉपी प्रकरणातील २१ संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश कोकण विभागीय मंडळाने संबंधित शिक्षण संस्थांना दिले होते. त्या आदेशानुसार संबंधित संस्थांनी नेमकी कोणती कारवाई केली, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.