जलजीवन मिशनची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा!

चिपळूण येथील बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचे स्पष्ट निर्देश
 संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेसह पाणीपुरवठा दिवसातून एकदाच किंवा एक दिवसाआड करण्याच्या सूचना

चिपळूण (प्रतिनिधी) : पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यासह जलजीवन मिशन योजनांची अंतिम टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच पाण्याची बचत करण्यासाठी ग्रामपंचायतींनी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याऐवजी दिवसातून एकदाच किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शुक्रवारी चिपळूण पंचायत समितीमध्ये तालुक्याचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहेत. या योजनांची किरकोळ कामे पूर्ण केल्यास त्या तातडीने सुरू होऊ शकतात. त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून योजना ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित कराव्यात, असे निर्देश रानडे यांनी दिले. कमी पावसामुळे पाण्याचे स्रोत आटण्याची शक्यता असून, अशा परिस्थितीत पाण्याची नासाडी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गावोगावी बंधारे उभारण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांजवळ पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व पटवून देत जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढवावा. गावातील विविध घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास संभाव्य पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल, असे रानडे यांनी सांगितले. या बैठकीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचाही आढावा घेण्यात आला. गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने या अभियानात राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल रानडे यांनी समाधान व्यक्त केले. हे यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही आगामी काळात अभियानातील गुणांकन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. यंदा अभियानाचे निकष बदलले असून, नव्या निकषांनुसार कामकाजावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती संदेश आयरे, गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी आणि तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.