कलंबिस्तमध्ये वाचक प्रेरणा दिन व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात  

सावंतवाडी । प्रतिनिधी : कलंबिस्त येथे वाचक प्रेरणा दिन आणि माजी विद्यार्थी मेळावा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय व कलंबिस्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वाचाल तर वाचाल’ या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाची सुरुवात श्री देवी सरस्वती मातेच्या पूजनाने झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय व कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी गावातील मराठी शाळा आणि वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यावर भर दिला.

आजच्या तंत्रज्ञान युगात मोबाईलचा वापर वाढल्याने वाचन संस्कृती कमी होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पालकांनी स्वतः मोबाईल बाजूला ठेवून ज्ञानेश्वरी आणि इतिहासकालीन पुस्तकांचे वाचन केले, तरच मुले वाचन संस्कृतीकडे वळतील, असे प्रतिपादन त्यांनी केले. गावातील मराठी शाळा बंद पडू नयेत यासाठी ग्रामपंचायतीने मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी माफ करण्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

तसेच कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाच्या वतीने MPSC आणि UPSC परीक्षांसाठी लागणारे अभ्यासक्रम, पुस्तके आणि मार्गदर्शन वर्ग उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून येत्या पाच वर्षांत गावातील किमान एक तरी विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदावर पोहोचेल, अशी घोषणा ॲड. सावंत यांनी केली.

यावेळी सावंतवाडीच्या सरपंच सपना सावंत, माजी पंचायत समिती सदस्य तथा संचालक रमेश सावंत, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय शेडगे, कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा तथा संचालिका मीनल जंगम, संचालक सखाराम उर्फ बाबू सावंत, अनिल उर्फ भाई सावंत, सिद्धेश सावंत, बाळा राजगे, माजी सरपंच बाळू सावंत, माजी सैनिक सगणु पास्ते, पांडुरंग सावंत, बाळा सावंत, कवी रवींद्र तावडे, शिक्षिका श्वेता सावंत, विनायक शिरसाट, ग्रंथपाल कविता जाधव, दीपा श्री जाधव, किशोर वालावलकर, रवी कमल सावंत, अंगणवाडी सेविका सौ. बिडये व सौ. पवार यांच्यासह अनेक शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील व इतर विविध पुस्तकांचे वाचन केले. स्वानंद पावसकर, जीविका सावंत, ऋतिका सावंत आणि सौरभ कलंबिस्तकर या विद्यार्थ्यांनी गोष्टी व शास्त्रज्ञांच्या पुस्तकांचे वाचन करून उपक्रमात सहभाग नोंदवला. जयसिंग देसाई यांच्या वतीने अंगणवाडीतील मुलांना पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

तसेच माजी विद्यार्थी रवींद्र तावडे आणि रवी कमल सावंत यांच्या हस्ते शाळेला आवश्यक असणाऱ्या भौतिक वस्तूंचे किट मुख्याध्यापक संजय शेडगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. वाचनालयाच्या वतीने इयत्ता पहिली ते चौथीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाचनाची सवय लागावी म्हणून पुस्तक संच उपलब्ध करून देण्यात आला.

मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रोजगार आणि नोकरीच्या शोधात ग्रामस्थ शहरांकडे जात असल्यामुळे गावातील शाळांची पटसंख्या कमी होत आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यास गावे गजबजतील आणि शाळाही टिकतील. तर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय शेडगे यांनी मराठी शाळांमधील भौतिक सुविधांच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रेया शरद सावंत यांनी केले. या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानमंदिर वाचनालयातही सरस्वती पूजन करून गावातील शाळा आणि वाचनालयाकडे नागरिकांचा ओढा वाढवावा, अशी प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी वाचनालयाच्या सचिव रूपा सावंत यांच्यासह इतर सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते. शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजनांचेही आयोजन करण्यात आले होते.