सावंतवाडीत वकील संघटनेतर्फे ‘कर आणि गुंतवणूक’ विषयावर व्याख्यान

सीए सुधीर नाईक यांचे मार्गदर्शन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने आयोजित ‘लेक्स डिस्कशन’ या व्याख्यानमालेतील बारावे पुष्प सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालयात पार पडले. या कार्यक्रमात सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सुधीर नाईक यांनी मुख्य अतिथी आणि प्रमुख वक्ते म्हणून ‘कर आणि गुंतवणूक’ तसेच ‘करांचे व्यवस्थापन आणि सुरक्षित गुंतवणूक’ या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

बदलत्या आर्थिक धोरणांच्या काळात नागरिकांनी आपल्या कष्टाच्या पैशांचे योग्य नियोजन करणे आणि कर रचनेची अचूक माहिती ठेवणे ही आजच्या काळाची मोठी गरज बनली आहे, असे प्रतिपादन सीए सुधीर नाईक यांनी आपल्या व्याख्यानात केले. त्यांनी प्राप्तिकर कायद्यातील नवीन बदल आणि लागू असणाऱ्या विविध कर सवलतींची अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली. कायदेशीर क्षेत्रातील व्यावसायिकांनी व नागरिकांनी आपला पैसा सुरक्षितपणे वाढवण्यासाठी म्युच्युअल फंड, शेअर्स आणि मुदत ठेवी यांमध्ये कसा समतोल साधावा, हे सांगतानाच प्रत्येकासाठी टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम किती महत्त्वाचा आहे, याचे विस्तृत विश्लेषण त्यांनी केले.

व्याख्यानानंतर पार पडलेल्या खुल्या चर्चासत्रात उपस्थित वकील आणि विधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध क्लिष्ट करविषयक प्रश्नांना सीए सुधीर नाईक यांनी अत्यंत सोप्या भाषेत उत्तरे दिली. हे चर्चासत्र साधारण दीड तास चालले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी बाबुराव रणशूर यांनी सीए सुधीर नाईक यांचे स्वागत केले. या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा महिला उपाध्यक्ष ॲड. नीता गावडे, सावंतवाडी वकील संघटनेचे ॲड. राघवेंद्र नार्वेकर, ॲड. वीरेश राऊळ, ॲड. राबिया आगा, ॲड. अंकुश ठाकूर, ॲड. अलका कासकर, ॲड. राहुल मडगावकर, ॲड. वामन निर्गुण यांच्यासह मोठा वकीलवर्ग आणि विधी विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ॲड. राबिया आगा यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांनी मानले.