पुरस्कार सोहळ्यातील घाईगडबड व गोंधळावर पदाधिकाऱ्यांची नाराजी
पुरस्कार जिल्ह्यातच प्रदान करण्याची मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सावंतवाडीतील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालाईवाडा या मंडळाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा ‘महा गणेशोत्सव’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. मात्र, या पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान आयोजकांनी केलेल्या घाईगडबडीमुळे आणि निर्माण झालेल्या गोंधळामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हा बक्षीस वितरण सोहळा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत सालाईवाडा मंडळाला ५० हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असा पुरस्कार मिळाला.
पत्रकार परिषदेत बोलताना मंडळाचे उपाध्यक्ष अमरनाथ सावंत म्हणाले की, कार्यक्रमाच्या अवघ्या आदल्या दिवशी फोन करून मुंबईला येण्याचे सांगण्यात आले. ६०० किलोमीटरचा प्रवास करून पोहोचल्यानंतर अत्यंत घाईगडबडीत पुरस्कार देण्यात आले. आतापर्यंतच्या अनुभवात हा पहिलाच वाईट अनुभव आला आहे. यापूर्वी तीन वेळा तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मंडळाला सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. मंत्र्यांना वेळ नव्हता तर कार्यक्रमाची तारीख बदलायला हवी होती. त्यामुळे यापुढे असे पुरस्कार जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात यावेत, जेणेकरून कार्यकर्त्यांचा त्रास व खर्च वाचेल, अशी मागणी त्यांनी केली.
उत्सव समितीचे अध्यक्ष राजू भाट यांनी सांगितले की, १२१ वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळाने गेल्या पाच वर्षांत तीन वेळा पुरस्कार पटकावला आहे. मात्र, यंदा सांस्कृतिक मंत्रालयाची घाईगडबड स्पष्ट दिसली. दूरवरून आलेल्या सर्वच मंडळांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून कार्यक्रम संपताच सभागृहातील दिवेही बंद करण्यात आले. तसेच, गणेशोत्सवाच्या काळात निधन झालेले मंडळाचे अध्यक्ष राजा स्वार यांनी गेली ४५ वर्षे दिलेले योगदान लक्षात घेऊन हा पुरस्कार त्यांना समर्पित करण्यात येत असल्याचे भाट यांनी स्पष्ट केले.
सचिव साबाजी नार्वेकर यांनी पुरस्काराचे श्रेय सर्व गणेशभक्त व पदाधिकाऱ्यांना दिले. आमचे मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवते. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी इमारतीच्या नूतन सभागृहासाठी दिलेल्या ५ लाखांच्या निधीबद्दल त्यांनी केसरकर यांचे आभार मानले. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अमरनाथ सावंत, सचिव साबाजी नार्वेकर, उत्सव समिती अध्यक्ष राजू भाट, खजिनदार शिवप्रसाद बांदेकर, प्रतीक बांदेकर, सायली बांदेकर, विनोद सावंत, सुकन्या टोपले, प्रवीण मोरजकर, आबा पडते, कल्पना बांदेकर, मनोज सावंत, संतोष खानविलकर, प्रसाद नार्वेकर, अपर्णा भाट, मंगेश नानचे आदी उपस्थित होते.












