रिक्त पदे भरण्यासह कोकणाला प्राधान्य देण्याचे डॉ. स्वप्नील सांगळे यांचे आश्वासन
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संवेदनशील मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी व स्थानिक अडचणी समजून घेण्यासाठी त्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) डॉ. स्वप्नील सांगळे हे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
या पाहणी दरम्यान डॉ. सांगळे यांनी प्रसुती विभाग, आयसीयू, ब्लड बँक, कॅज्युअल्टी आणि सीटी स्कॅन सेंटरची पाहणी करून तिथल्या समस्या जाणून घेतल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब आणि रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी यांनी रुग्णालयातील विविध समस्यांकडे डॉ. सांगळे यांचे लक्ष वेधले होते. डॉ. सांगळे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा बारकाईने अभ्यास केला असून काही समस्या स्थानिक पातळीवर तात्काळ सोडवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. प्रायव्हेट प्रॉपर्टीतील स्वच्छतेची योग्य निगराणी न ठेवल्यास नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. रुग्णालयात ऑपरेशन थिएटर सुसज्ज असून स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध आहेत; मात्र लॅब टेक्निशियन आणि इतर आवश्यक पदे स्थानिक स्तरावर किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत भरण्यावर भर दिला जाईल. राज्य शासनामार्फत लवकरच दीड हजार डॉक्टरांची भरती केली जाणार असून त्यामध्ये कोकण भागाला विशेष प्राधान्य देऊन जास्तीत जास्त डॉक्टर उपलब्ध करून दिले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच वर्ग तीनची बहुतांश पदे भरलेली असून वर्ग चारची रिक्त पदे भरण्यासाठी त्वरित कारवाई केली जाईल.
पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनी आरोग्यविषयक ज्या बाबींकडे लक्ष वेधले आहे, त्यावर एकत्रितपणे काम करण्याचा टास्क आरोग्यमंत्र्यांनी दिला असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य पातळीवरून करावयाचा पाठपुरावा मुंबईत पोहोचल्यानंतर केला जाईल आणि त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच जमिनीवर दिसतील. सावंतवाडीतील बहुप्रतिक्षित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत बोलताना डॉ. सांगळे म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याने जागेचा प्रश्न सुटला असून निधी आणि मान्यता आधीच मिळाली आहे. सध्या कार्यरत असलेल्या रुमच्या शिफ्टिंगसाठी पर्यायी व्यवस्था शोधण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून मुख्य बांधकामाला सुरुवात करता येईल. हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सावंतवाडीतील नागरिकांसाठी १०० बेडचे सुसज्ज स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध होईल.
या दौऱ्याप्रसंगी जिल्हा आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सभापती सुस्मिता जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखील अवधूत, नगरसेवक बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, सुरज परब यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सर्व ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्य समस्या जाणून घेतल्याबद्दल डॉ. सांगळे यांचे आभार मानले. अनेक नादुरुस्त सुविधा पुढील १५ दिवसांत पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले असून आगामी काळात मतदारसंघातील सर्व आरोग्य समस्या निश्चितपणे सुटतील असा विश्वास संजू परब यांनी व्यक्त केला.














