विहिरी आटल्या..पाण्याचं दुर्भीक्ष अटळ!

गौरव पोंक्षे माखजन
यावर्षी अल निनो च्या भयाकारी प्रभावामुळे गणपती पूर्वीच पावसाने राम राम ठोकला.पाऊस आज पडेल,उद्या पडेल अशा आशेवर असलेल्या माणसाचा बहुतांश भ्रमनिरास झाला आहे.वाढलेल्या उष्णतेमुळे,रणरणत्या उन्हामुळे भूजलं पातळी लक्षणीय खालावली आहे.पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आटल्या असल्याने,नद्या कोरड्या पडायला लागल्या आहेत यामुळे यावर्षी पाण्याचे दुर्भीक्ष अटळ असल्याची चाहूल प्रकर्षाने भासवू लागली आहे.
सरासरी ऑक्टोबर नोव्हेंबर च्या महिन्यात परतीचा पाऊस बरसल्याने विहिरी तुडुंब भरलेल्या असतात,नद्या,गावा गावातील ओढे काठोकाठ वहात असतात परंतु सध्याची विहिरींची आणि नद्यांची पाणी पातळी,ही पाणी संकटाची नांदी आहे.सध्या विहिरींनी गाठलेली पाण्याची पातळी ही दरवर्षी च्या तुलनेत मे महिन्यात पाहायला मिळते.ऑक्टोबर मध्ये एवढी भूजल पातळी खालावली तर पुढच्या महिन्यांचे काय? असा मोठा प्रश्न सध्या सर्वांसमोर पडला आहे.
विहिरी आणि नद्यांची स्थिति पाहता कूपनलीकांचे यापेक्षा वेगळे नाही.सध्या जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर वनराई बंधारे घालण्याचे मिशन सुरु आहे.ते नेमके फोटोबाजी साठी की पाणी अडवण्यासाठी हा भाग वेगळा.पण अनेक ठिकाणी त्या बांधाऱ्यांमध्ये किती पाणी अडवले जाते,किती उंची ठेवली जाते?असे अनेक प्रश्न आहेत..काही ठिकाणी बंधारा घातल्यावर थोड्याच वेळात बांधावरून पाणी वाहून जात आहे.तर काही ठिकाणी तर ओढयातील पाणी आटल्याने बंधाऱ्यात विशेष पाणी साठलेले नाही.
ग्रामीण भागात विहिरींची जशी ही स्थिती आहे तशी चिपळूण रत्नागिरी सारख्या शहरात अनेक सोसायट्या कूपनलिकांवर अवलंबून आहेत.एक कूपनलिका सोसायटीतील एवढ्या कुटुंबांची खरंच तहान भागवेल का हा प्रश्न आहे.हळू हळू महिने सरतील तस तसे मनुष्याला चातका प्रमाणे पावसाची वाट पाहावी लागणार हे त्रिकाल बाधित सत्य आहे.
गणपती पूर्वी,गोकुळ अष्टमीनंतर पावसाचा जोर पूरता ओसरला.त्यानंतर पावसाने मागे वळून देखील पाहिले नाही.आज पडेल उद्या पडेल,सर्वपित्री अमावस्येला पडेल,पुढे नवरात्रात पडेल अशी भाबडी आशा ठेवलेल्या माणसाचा भ्रमनिरास झाला आहे.असलेले पाणी जपून वापरा अस जरी आपण केल तर निसर्गता वाढलेल्या तापमाणामुळे भूजलं पातळी खाली जायची थांबत नाही.वापरलं नाहींतरी आपोआप खडखडाट अटळ आहे.पण तरीही पाण्याचा अपव्यय टाळणे इष्टच.ग्रामीण भागातील जनतेला अजूनही चार पाच दिवस चांगला पाऊस पडेल अशी आशा आहे.
एकीकडे महान भातशेतीला कोकणात पाणी पुरले नाही,अखेरीचा पाऊस अद्याप न झाल्याने कडवा,पावटा,कुळीथ हे कस होणार या सीमित विवंचनेत असलेल्या माणसाला भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू शकते याची अजून पुसटशी कल्पना नसावी.त्यामुळे सध्या आठ दहा दिवस पाऊस पडावा अशी प्रार्थनाचं केली जात आहे.