आंबा घाटात मद्यधुंद तरूणांचा धिंगाणा; रस्त्यावर घेतली लोळण, गाड्या अडवल्या, पर्यटकांना शिवीगाळ केली; मद्यधुंद तरूणांवर कारवाईची होतेय मागणी

देवरूख (प्रतिनिधी):

प्रसिद्ध आंबा घाटातील कळकदरा भागात दोन मद्यधुंद तरुणांनी रस्त्यावर अक्षरश: धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दारूच्या नशेत धुंद असलेल्या या तरुणांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करत घाटातून जाणाऱ्या प्रवाशांच्या नाकी नऊ आणले. अत्यंत बेधुंद झालेल्या या दोन तरुणांनी चक्क भररस्त्यात लोळण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी येणाऱ्या- जाणाऱ्या गाड्या अडवून वाहनांवर दगड भिरकावले. तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना आणि वाहनचालकांना शिवीगाळ केली.

घाटातून प्रवास करणाऱ्या एका सजग प्रवाशाने या संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून मद्यपी तरुणांच्या या वर्तणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आंबा घाटासारख्या महत्त्वाच्या आणि नेहमी वर्दळ असलेल्या मार्गावर अशा प्रकारे उघडपणे धिंगाणा घातल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने आणि पोलिसांनी या हुल्लडबाज तरुणांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.

आंबा घाट हा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा ठिकाणी दारूच्या नशेत रस्त्यावर धिंगाणा घालण्याचा प्रकार केवळ हुल्लडबाजी नसून इतर प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणारा आहे. दगडफेकीमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच चालकाचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. आंबा घाटात अशा प्रकारे हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, तसेच घाट परिसरात गस्त आणि निगराणी वाढवावी, अशी मागणी होत आहे. या तरुणांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.