आचरा–पारवाडी नदीवर कच्च्या बंधाऱ्याची चाचपणी

जलसाठ्यासह गाळ उपशाचाही दुहेरी फायदा!

आमदार नीलेश राणे यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांकडून पाहणी; ग्रामस्थांचाहसकारात्मक प्रतिसाद

आचरा -अर्जुन बापर्डेकर
उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करत आचरा आणि पारवाडी तसेच आचरा परिसराची भविष्यातील पाण्याची गरज भागविण्याच्या दृष्टीने आचरा–पारवाडी नदीवर कच्चा बंधारा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नदीतून समुद्राकडे वाहून जाणारे गोडे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करणे, तसेच गाळाने भरलेल्या नदीपात्राचा काही भाग मोकळा करणे, अशा दुहेरी उद्देशाने या प्रस्तावाची चाचपणी करण्यात येत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत नदीपात्राची पाहणी केली.
भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन आचरा नदीतून वाहून जाणारे गोडे पाणी अडविण्यासाठी कच्चा बंधारा उभारण्याची मागणी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी आमदार नीलेश राणे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार राणे यांच्या सूचनेनुसार मालवणच्या गटविकास अधिकारी परागिणी पाटील आणि भूजल व जलसंधारण विभागाचे सहाय्यक अभियंता मनोज वनमोरे यांनी आचरा–पारवाडी नदीपात्राची पाहणी केली. आचरा आणि पारवाडी परिसरातील पाणीप्रश्नावर दीर्घकालीन उपाय शोधण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरू शकतो. कच्च्या बंधाऱ्याच्या माध्यमातून गोड्या पाण्याचा साठा वाढविणे आणि नदीपात्रातील गाळ कमी करण्याच्या प्रयत्नांना यश आल्यास परिसराच्या जलसुरक्षेला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
या पाहणीवेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, सदस्य चंदू कदम, चावलं मुजावर, पंकज आचरेकर, अभय भोसले, परेश सावंत तसेच पारवाडीतील उमेश सावंत, अरुण आपकर, अमर पळसंबकर, बापू कदम, प्रशांत परब, किशोर शिर्के, मिलिंद मुळये, चंदू साळकर, प्रदीप केळकर, सूर्यकांत शेटये, स्वप्नील भाटकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान नदीवर योग्य ठिकाणी कच्चा बंधारा उभारल्यास काही काळ गोड्या पाण्याचा साठा निर्माण करणे शक्य होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. या पाण्यामुळे भूजल पुनर्भरणास चालना मिळून परिसरातील विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आचरा आणि पारवाडी परिसरातील पाणी उपलब्धतेचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे. पाहणीदरम्यान अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या चर्चेत या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.

आचरा आणि पारवाडीच्या शेती-बागायतीला दिलासा मिळण्याची अपेक्षा
आचरा–पारवाडी परिसरातील अनेक कुटुंबांची शेती आणि बागायती पाण्यावर अवलंबून आहे. नारळ, सुपारी, आंबा, काजू तसेच भातशेतीसाठी पाण्याची उपलब्धता महत्त्वाची असते. नदीपात्रात गोड्या पाण्याचा साठा निर्माण झाल्यास त्याचा लाभ नदीकाठच्या शेतीला होण्याबरोबरच भूजलपातळी सुधारण्यासही मदत होऊ शकते. विहिरींमध्ये अधिक काळ पाणी टिकल्यास उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो.
दुष्काळसदृश परिस्थितीत पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवणे आणि गावाच्या भविष्यातील गरजांसाठी स्थानिक जलस्रोत सक्षम करणे, या दृष्टीने कच्च्या बंधाऱ्याचा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे.

नदीपात्रात सुरुवातीला कच्चा बंधारा उभारून त्यानंतर निर्माण होणाऱ्या पाणीसाठ्याची आणि परिसरावरील परिणामांची परिस्थितीनुसार तपासणी करण्याचा विचार आहे. बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी किती वाढते, भरतीच्या पाण्याचा प्रभाव कसा राहतो आणि नदीकाठच्या परिसरावर त्याचे काय परिणाम होतात, याचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे.
बंधाऱ्यामुळे कोणत्याही घटकाला बाधा पोहोचणार नाही, याची खात्री करून तसेच स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.
आचरा नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात गाळाने भरलेले असल्याने नदीपात्रातील काही प्रमाणात गाळ काढण्याची संकल्पनाही या उपक्रमाशी जोडली जात आहे. नियोजनपूर्वक गाळ उपसा करून नदीपात्राचा काही भाग मोकळा करणे आणि त्याच परिसरात गोड्या पाण्याचा साठा निर्माण करण्यासाठी कच्चा बंधारा उभारणे, असे दोन फायदे साधण्याचा प्रयत्न आहे.
भविष्यात भूजलपातळीत सुधारणा झाल्यास लगतच्या परिसरातील विहिरींमध्ये पाणी टिकण्यास मदत होऊ शकते. त्यातून आचरा गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेसाठी स्थानिक जलस्रोत अधिक सक्षम होण्याची शक्यता आहे. मात्र, गाळ उपसा, बंधाऱ्याची रचना आणि पाणीसाठ्याचे नियोजन याबाबत प्रत्यक्ष पाहणी व तांत्रिक अभ्यासानंतरच अंतिम निर्णय होणार आहे.