महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बांदा (प्रतिनिधी) : शेर्ले येथील श्री देवी माऊली मंदिरात आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत सुप्रिया वारंग पैठणीच्या मानकरी ठरल्या. अर्चना धुरी द्वितीय तर अस्मिता आरोस्कर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सान्वी धुरी हिच्या वाढदिवसानिमित्त धुरी कुटुंबीयांच्या वतीने शेर्ले येथील माऊली मंदिरात ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तीन तासांहून अधिक काळ रंगलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा, कौशल्याधारित स्पर्धा आणि धमाल उपक्रमांमुळे माऊली मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेतील प्रत्येक फेरीत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपले कौशल्य आणि समयसूचकता दाखवली.
चुरशीच्या अंतिम फेरीत सुप्रिया वारंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पैठणीचा मान पटकावला. अर्चना धुरी यांनी द्वितीय तर अस्मिता आरोसकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांचा उपस्थितांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
खेळादरम्यान हास्य-विनोद, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त दाद यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. नवरात्रोत्सवाच्या आनंदात महिलांना एकत्र आणत मनोरंजन, स्पर्धात्मकता आणि स्नेहभावाचा अनुभव देणारा हा उपक्रम ठरला.
कार्यक्रमाचे निवेदन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जे. डी. पाटील आणि स्वाती पाटील यांनी केले. त्यांच्या उत्स्फूर्त, मिश्कील आणि प्रभावी निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम शेर्लेतील नवरात्रोत्सवातील आनंदाचा अविस्मरणीय क्षण ठरला.
———–











