विजयदुर्ग (प्रतिनिधी) : विजयदुर्ग किल्ल्याचे सरसेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी आज विजयदुर्ग किल्ल्याला भेट दिली. कोटकामते येथील कुलस्वामिनी कुलदैवत इनामदार आई भगवती देवीच्या वार्षिक नवरात्रोत्सवला भेट दिल्यानंतर ते विजयदुर्गला आले होते. दरम्यान, रामेश्वर येथील रामेश्वर मंदिर शेजारी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभागामार्फत सुरू असलेल्या स्वराज्याचे तिसरे सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी जीर्णोद्धार कार्याची आणि आंग्रे आरमार सृष्टीची पाहणी केली. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभागामार्फत सुरू असलेले कार्याचे कौतुक करताना काही महत्वाच्या सूचना रघुजीराजे आंग्रे यांनी दिल्या.
समाधी जीर्णोद्धारासोबत तोफेला तोडगाडा बसवून या शिवकार्याचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण करून लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे. तसेच या शिवकार्याचा दुसरा टप्पा भिंतीवर कोरीव माध्यमातून आपले मराठा आरमार मधील युद्ध जहाजे आणि त्याचा इतिहास लावण्यात येणार आहे. याची विस्तृत माहिती सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे जिल्हा सचिव दीपक करंजे यांनी राजेना दिली. यावेळी श्रीदेव रामेश्वर मंदिर देवस्थान, ट्रस्टचे अध्यक्ष सचिन खडपे उपस्थित होते. चालू असणाऱ्या कार्याबाबत सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे जिल्हा सचिव तथा मोहीम प्रमुख दिपक करंजे यांनी राजेंना दिली. त्यानंतर विजयदुर्ग गावातील दोन्ही नवरात्रोत्सव मंडळाना भेटी दिल्या.
श्री दुर्गामातेचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी दोन्ही नवरात्रौत्सव मंडळाने शाल व श्रीफळ देऊन रघुजीराजे आंग्रे यांचा सन्मान केला. दरम्यान, विजयदुर्ग येथील सुरू असलेल्या मराठा आरमारसृष्टीच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. या शिवसृष्टीचे श्री. आंग्रे हे एक भाग असल्याने सर्व जागेची पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास मंडळ, विजयदुर्ग मार्फत देखील श्री. आंग्रे यांचा शाल श्रीफळ व भगवा फेटा देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी श्रीदेव रामेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सचिन खडपे, देवस्थानचे पुजारी, सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग जिल्हा सचिव दिपक करंजे, शिवप्रेमी महेश बिडये, यशपाल जैतापकर, सह्याद्रीचे दुर्गसेवक भावेश कणेरे, निलेश नार्वेकर, अवधूत पाटील, योगेश डोंगरे, रविकांत राणे, चंद्रकांत बिडये, राजेंद्र परुळेकर, गणेश मिठबावकर, दामाजी पाटील, योगिता परुळेकर, आर. डी.सारंग आणि शिवप्रेमी उपस्थित होते.













