वेंगुर्ले येथे नशा मुक्त युवा कार्यक्रमातून निरोगी, सक्षम आणि जबाबदार तरुणाई घडविण्याचा संदेश

वेंगुर्ले : प्रतिनिधी
मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग यांच्या वतीने नशामुक्त युवा कार्यक्रम वेंगुर्ले येथील ओद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ‘नशामुक्त युवा, समृद्ध भारत’ या संकल्पनेतून निरोगी, सक्षम आणि जबाबदार तरुणाई घडविण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, मेरा युवा भारतचे माजी समन्वयक तुषार परब, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, पर्यावरण अभ्यासक प्रसाद गावडे, मनोज परुळेकर तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, वेंगुर्ला येथील शिक्षक कोदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व युवकांना मार्गदर्शन केले. व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व, व्यसनांचे शारीरिक व सामाजिक दुष्परिणाम आणि युवकांची सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. समाजात व्यसनमुक्तीची जनजागृती करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

युवकांनी आपल्या आयुष्यात शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे. व्यसनांपासून दूर राहून स्वतःचे तसेच कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘नशामुक्त युवा, समृद्ध भारत’ या संकल्पनेतून निरोगी, सक्षम आणि जबाबदार तरुणाई घडविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.