काळोख्या वाटेवर रक्ताचा सडा…
सैतानी प्रियकराने दामिनीला निर्घृणपणे संपवले!
विलास कुडाळकर (कुडाळ):
सिंधुदुर्गसारख्या शांत जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. हॉटेल मॅनेजमेंट करून मोठ्या शहरात नोकरी मिळवण्याचं आणि आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करण्याचं वर्दे येथील दामिनी पालव हिचं स्वप्न आता कायमचं रक्ताच्या थारोळ्यात विरघळलं आहे. तिच्याच सोबत शिकणाऱ्या साहिल धुरी याने तिच्यावर चाकूने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केली. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याची खात्री झाल्यावरच तो नराधम माघारी फिरला. त्याने केवळ दामिनीच्या कोवळ्या आयुष्याचाच नाही, तर तिच्या गरीब कुटुंबाच्या आशेचाही अत्यंत निर्दयी अंत केला. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण ते इतकं क्रूर, अमानुष आणि रक्तपिपासू असू शकतं, याची कल्पनाही कुणी केली नसेल. साहिल आणि दामिनी यांच्यातील प्रेमसंबंधांचा असा भयानक शेवट होईल, हा विचारही काळजाचा ठोका चुकवणारा आहे.
दामिनीचं जगणं म्हणजे एक अखंड संघर्ष होता. तिचे वडील घरांना रंगकाम करून कसेबसे चार पैसे कमवायचे. ‘आपल्या मुलीने खूप शिकावं, गरिबीतून बाहेर पडावं’ या आशेवर ते रात्रंदिवस घाम गाळत होते. बापाच्या घामाची आणि कष्टाची जाणीव दामिनीला पुरेपूर होती. म्हणूनच वर्दे ते पिंगुळी हा एसटी बसचा प्रवास आणि पुढे कडावल ते वर्दे अशी थकवणारी पायपीट करत ती रोज शिक्षणासाठी धडपडत होती. हॉटेल मॅनेजमेंटची पदवी हातात पडली की मोठ्या शहरात जाऊन आपल्या कुटुंबाला गरिबीच्या खाईतून कायमचं बाहेर काढायचं, हेच तिचं एकुलतं एक ध्येय होतं. घरातील मोठी बहीण म्हणून तिने सर्व जबाबदारी पेलण्याची तयारी केली होती. पण दुसरीकडे, साहिलच्या डोक्यात काहीतरी भयंकर आणि काळोखं शिजत होतं.
या संपूर्ण घटनेतील सर्वात हृदयद्रावक आणि काळजाला घरे पाडणारा प्रसंग म्हणजे शनिवारची ती काळोखी संध्याकाळ… एसटीतून कडावल येथे उतरल्यानंतर ती वर्दे गावातील आपल्या घराकडे जाण्यासाठी नेहमीच्या मधल्या वाटेने निघाली. वाटेत असतानाच तिने आईला फोन केला आणि आईसाठी आवडीने एक वडापावही विकत घेतला. हातात तो वडापाव घेऊन ती झपाझप पावले टाकत निघाली होती. आकाशात ढगांची दाटी झाली होती आणि अंधार दाटून आला होता. इतक्यात त्या निर्मनुष्य वाटेवर साहिलने तिला हाक मारली. अचानक त्याला तिथे पाहून ती थबकली. धोक्याची चाहूल लागल्याने ती वेगाने चालू लागली, पण तोवर त्या सैतानाने धारदार सुरा काढून तिच्या मानेवर वार केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने प्रतिकार केला, हात पुढे केले, पण त्या नराधमाने पोटावर, पाठीवर… जिथे जागा मिळेल तिथे सपासप वार केले. अखेर ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली.
हा रक्तरंजित खेळ संपवून रक्ताळलेल्या कपड्यांनिशी त्याने मोटारसायकलवरून तिथून धूम ठोकली. काही वेळातच या भयानक घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. कुणीतरी तिच्या कुटुंबीयांना हा निरोप दिला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला अशा रक्ताच्या थारोळ्यात पाहून आई-वडिलांनी जो हंबरडा फोडला, त्याने तिथे उपस्थित असलेल्या कठोर मनाच्या पोलिसांचेही डोळे पाणावले. लहान बहिणीने ताईसाठी मारलेली आर्त साद आणि आईचा काळीज चिरणारा आक्रोश ऐकून सभोवतालचं संपूर्ण वातावरण सुन्न झालं होतं. एक हसरी, कष्टाळू मुलगी, तिच्या डोळ्यांतील मोठी स्वप्नं आणि एका बापाची आयुष्यभराची पुंजी… सगळंच एका क्षणात उद्ध्वस्त झालं. साहिलने फक्त एका तरुणीचा खून केला नाही, तर एका गरीब कुटुंबाच्या जगण्याच्या उमेदीचाच कायमचा गळा घोटला आहे.













