रत्नागिरी शहरात क्रिकेट खेळताना तरुणाचा अचानक मृत्यू; चवंडेवठार येथील दुर्घटनेने हळहळ

रत्नागिरी:
रत्नागिरी शहरातील चवंडेवठार येथील लक्ष्मी चौक परिसरात क्रिकेट खेळत असताना एका ३५ वर्षीय तरुणाचा चक्कर येऊन अचानक मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. स्मित नरेंद्र चवंडे (वय ३५ वर्षे, रा. चवंडेवठार, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्मित चवंडे हे १८ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या मित्रांसोबत चवंडेवठार येथील लक्ष्मी चौक येथे अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर बेशुद्ध होऊन पडले. ही बाब समजताच मयताचे मित्र युगेश सावंत यांनी मयताचे भाऊ सुशांत चवंडे यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्मित यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील परकार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक १३१/२०२६) करण्यात आली आहे.