खेड (प्रतिनिधी) : खेड–दापोली मुख्य रस्त्यावरून दापोलीच्या दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या मच्छी वाहतूक वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत शिवसेनेचे खेड शहरप्रमुख कुंदन सातपुते यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली असून संबंधित वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून मच्छीची वाहतूक करताना त्यातून बाहेर पडणारे दुर्गंधीयुक्त पाणी योग्य पद्धतीने साठवून त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी रस्त्यावर सोडले जात आहे. विशेषतः मच्छी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये मासळीमधून निघणारे पाणी साठवण्यासाठी असलेल्या स्टोरेज टँकमध्ये ते योग्य प्रकारे साठवले जात नसून या टँकमधील पाणी पाइपमधून रस्त्यावर गळत असल्याने मुख्य रस्त्यावर दुर्गंधी पसरत आहे.
खेड–दापोली हा या भागातील महत्त्वाचा मार्ग असून हा मार्ग खेड शहरातून जातो. शहरातील या मार्गावर अनेक दुकाने व रहिवासी इमारती देखील आहेत. तसेच या रस्त्यावरून दररोज अनेक वाहने आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा वर्दळीच्या मार्गावर मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी गळत राहिल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ येत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून सार्वजनिक स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
मच्छी वाहतूक करताना वाहनांमध्ये साठणारे पाणी रस्त्यावर पडणार नाही, याची संबंधित वाहनचालकांनी आणि मालकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, या बाबीकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक रस्त्यांवर अस्वच्छता निर्माण होत असून संबंधित यंत्रणेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी केली आहे.
शिवसेनेचे खेड शहरप्रमुख कुंदन सातपुते यांनी प्रादेशिक परिवहन विभागाने या प्रकाराची दखल घेऊन मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी, तसेच दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडणाऱ्या वाहनांवर योग्य ती कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांना स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त वातावरणात प्रवास करता यावा, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संबंधित वाहनांवर कारवाई न झाल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही कुंदन सातपुते यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे.
आता प्रादेशिक परिवहन विभाग या तक्रारीची कितपत दखल घेतो आणि खेड–दापोली मुख्य रस्त्यावरील दुर्गंधीच्या समस्येवर कोणती ठोस कारवाई करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी आणि सार्वजनिक स्वच्छतेशी संबंधित या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.













