भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा राजीनामा

चिपळूण (प्रतिनिधी) – भाजप दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण बुधवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्षांची भेट घेवून त्यांच्याकडे राजीनामा दिला. मात्र प्रदेशाध्यक्ष त्यांचा राजीनामा मंजूर करतात का ? याची सर्वांना उत्सुक्ता लागली आहे.

रत्नागिरी शहराचे नगराध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित झाले आहे. भाजपमधून ठाकरे गटात गेलेले बाळ माने नगराध्यक्षपदासाठी त्यांची सून शिवानी माने हिला उमेदवारी मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. शिवानी माने हि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मुलगी आहे. शिवानी माने हिला महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली तर राजेश सावंत यांना आपल्याच मुलगीच्या विरोधात म्हणजे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल. त्यामुळे कौटूंबिक आणि राजकीय संघर्ष टाळण्यासाठी सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण बुधवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. येथील प्राथमीक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात भाजपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी चहापान घेतला त्यावेळी सावंत यांनी राजीनामा दिला. त्यावेळी आपली अडचणही त्यांनी प्रदेशाध्यक्षांना सांगितली. त्यावर प्रदेशाध्यक्ष काहीही बोलले नाहीत. मात्र, सावंत यांच्या पाठीवर हात मारून ते सावंत यांना कार्यक्रमाला सोबत घेवून गेले.