गरबा महोत्सवात सिद्धेश जालगावकर यांचे गाजले भन्नाट नृत्य
गुहागर/ प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे रहिवासी सिद्धेश विलास जालगावकर यांनी नवी मुंबईतील जुईनगर येथील गरबा महोत्सवात आपल्या दमदार नृत्यशैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. ९ दिवस गरबा खेळून त्याच्या भन्नाट नृत्याच्या रिल्सने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याच्या रिल्सने आजपर्यंत ८१ लाख ९८ हजार व्ह्यूजचा टप्पा गाठला.
नवी मुंबई जुईनगर येथील सावित्रीबाई फुले नवरात्रोत्सव मंडळाच्या नवसाला पावणारी जुईनगरची अंबामाता येथे ९ दिवस आयोजित गरबा कार्यक्रमात सिद्धेश जालगावकर आणि रमेश मैत्रे व टीमचा सोशल मीडियावर जलवा पाहायला मिळाला. गेले ९ दिवस न थांबता गरबा खेळून आपल्या भन्नाट डान्सने आणि जबरदस्त स्टाईलने त्याने सर्वांना वेड लावले. त्याच्या टीममधील तनिष पवार, कुणाल वैद्य, आदित्य, सार्थक, गणेश, अलंकार यांचीही त्याला साथ मिळाली. आपल्या भन्नाट डान्स स्टेप्स, जबरदस्त एनर्जी आणि आकर्षक नृत्यशैलीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण गरबा महोत्सवात प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला लावले. त्यांच्या नृत्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया येथे गेल्या वर्षी राष्ट्रीय एकता दिवस परेड कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या आकर्षक व वैचारिक चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्ररथाचे नेतृत्व सिद्धेश जालगावकर यांनी केले होते. अष्टत्त्व, एकत्व विचारधारा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा मूलमंत्र तसेच शक्ती, ज्ञान, दृष्टी, सुरक्षा, योग आणि समृद्धीसारख्या तत्त्वांचे प्रभावी सादरीकरण करून महाराष्ट्राचे नाव देशभरात उज्ज्वल केले होते.













