तळवली हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी देवस्थानकडून 15 हजार रूपये कायम ठेव
गुहागर प्रतिनिधी:
मंदिरात केवळ धार्मिक उपक्रम न राबवता सामाजिक बांधिलकी जोपासत तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवी देवस्थानने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. विद्यार्थांना त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामदेवता देवस्थानच्यावतीने
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीला रोख रुपये 15 हजार कायम ठेव म्हणून देण्यात आली.
गुणवंत विद्यार्थ्यांना तळवली पंचक्रोशीतील उदार देणगीदारांकडून कायम ठेव ठेवण्यात आली आहे. या योजनेतून आलेल्या व्याजाची रक्कम प्रत्येक वर्षी वार्षिक बक्षीस वितरण समारंभात इयत्ता 5 वी ते 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात सन्मानपूर्वक वाटप करण्यात येते.त्यात ग्रामदेवता श्री सुकाईदेवी देवस्थान तळवलीकडून रोख 15 हजार रुपये कायम ठेव ठेऊन भर घालण्यात आली आहे.यावेळी प्रा.अमोल जड्याळ यांनी देवस्थान समितीच्या कार्याविषयी माहिती दिली व देवस्थान समितीच्या सर्व पदाधिका-यांचे प्रशालेच्या वतीने आभार मानले. दरवर्षी ग्रामदेवस्थानकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात.या उपक्रमातून होणारा नफा उद्याचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी देखील उपयोगी यावा या सामाजिक जाणिवेतून राबविलेल्या या उपक्रमाचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी ग्रामदेवता श्री सुकाईदेवी देवस्थान तळवलीचे अध्यक्ष गणपत शिगवण,उपाध्यक्ष अशोक सांगळे,सचिव प्रदीप चव्हाण, खजिनदार अनंत डावल,सदस्य चंद्रकांत बोटके, सुरेश सांगळे, दिलीप आग्रे, सचिन कळंबाटे इत्यादी पदाधिका-यांनी प्रत्यक्ष शाळेस भेट देऊन मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांच्याकडे 15 हजार रुपये कायम ठेव ठेवण्यासाठी सुपुर्द केले.शिक्षक प्रविण केळस्कर यांनी देवस्थानच्या सर्व पदाधिका-यांचे प्रशालेच्या वतीने आभार मानले.













