साईराज शिंदे याची हैदराबाद येथील प्री-आरडी परेड शिबिरासाठी निवड

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठांतर्गत भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक साईराज गजानन शिंदे (द्वितीय वर्ष बीएसस्सी) याची पश्चिम क्षेत्र पूर्व प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी (प्री आरडी परेड) निवड झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय निवड शिबिरातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाराष्ट्राच्या संघात साईराज याची पश्चिम क्षेत्र पूर्व प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी अंतिम निवड झाली आहे. साईराज शिंदे हा पुढील अंतिम निवडीकरिता तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे जाणार आहे. हैदराबाद येथील अनुराग युनिव्हर्सिटी (वेंकटपूर, मेदचल-मल्काजगिरी जिल्हा) येथे हे १० दिवसांचे प्री-आरडी परेड निवड शिबिर १० ते १९ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. साईराजला प्राचार्य मधुरा पाटील, संस्थाचालक, प्राध्यापकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.