शिरोडा – वेळागर येथील ताज प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाचे पर्व सुरु…

पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या मुळे प्रकल्प मार्गस्थ..

शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था मर्या. संचालक मंडळाची सभा संपन्न..

वेंगुर्ले : दाजी नाईक 

शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था मर्यादित च्या संचालक मंडळाची सभा संस्थेच्या कार्यालयात पार पडली. सदर बैठकीत ताज प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ताज प्रकल्पाचे काम व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानूग्रह अनुदान वाटप सुरु झाल्यामुळे सर्व संचालकांनी समाधान व आनंद व्यक्त केला. प्रकल्पाबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष श्री. शरद कांबळी यांनी असे सांगितले कि, शिरोडा वेळागर येथे बहुचर्चित I.H.C.L कंपनीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंचतारंकित हॉटेल उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे कुशल नेतृत्व व माजी शालेय शिक्षण मंत्री तथा या भागाचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा संयमी व कणखर पाठपुरावा या दोघांच्या समन्वयाने या प्रकल्पाच्या मार्गातील तांत्रिक, प्रशासकीय इत्यादी अडचणी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मदतीने कौशल्याने सोडवून प्रकल्प मार्गस्थ करण्यात यश मिळविले.

या भागाचे माजी आमदार शंकर कांबळी यांनी प्रथम, आमदार दीपक केसरकर यांना या प्रकल्पात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार श्री. केसरकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढला व येथूनच प्रकल्पाचा प्राथमिक टप्पा सुरु झाला. तदनंतर पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी दिपक केसरकर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांच्या सहकार्याने प्रकल्प अंतिम टप्प्यात नेला. शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था मर्यादित, या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या संस्थेने M.T.D.C व I.H.C.L कंपनीशी त्रिपक्षीय करार करून त्या प्रकल्पात महत्वाची भूमिका पार पाडली. या करारानुसार शेतकऱ्यांना मिळणारे सानूग्रह अनुदानाचे वाटप सुद्धा सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाची व उत्साहाची भावना निर्माण झाली आहे. तसेच या प्रकल्पाच्या अनुषंगाने जी रोजगार निर्मिती होणार आहे. त्या रोजगारात सुद्धा प्रकल्पबाधित शेतकरी / त्यांचे वारस व स्थानिक रहिवाशी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे अन्य जोड धंदे सुद्धा या विभागात सुरु होणार आहे, त्यामुळे शिरोडा पंचक्रोशीत सुद्धा खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’ या घोषणेनुसार जिल्ह्यातील युवकांना आता जिल्ह्यातच या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या युवकांना आता रोजगारासाठी जिल्ह्या बाहेर किंवा इतर राज्यात जावे लागणार नाही. त्या दृष्टीने ‘रिव्हर्स मायग्रेशन’ हि घोषणा अमलात येणार आहे.

पालकमंत्री श्री. नितेश राणे व या भागाचे आमदार श्री. केसरकर या दोघांचा सांघिक प्रयत्न व त्यांना जिल्हाधिकारी श्रीमती. तृप्ती धोडमिसे यांचे खंबीर प्रशासकीय धोरण व जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गटणे यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांचे महत्वाचे योगदान, या सर्वामुळे ह्या प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला, त्यामुळे संस्था या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देते. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था मर्यादित हि संस्था स्थापन झाली व प्रकल्प मार्गस्थ झाला त्या सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याबद्दल संस्था त्यांनाही धन्यवाद देते असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. शरद उर्फ नंदू कांबळी, सचिव श्री.मंगेश गोपाळ डोंगरे तसेच संचालक श्री. जगन्नाथ डोंगरे, श्री. लक्ष्मीकांत उर्फ विनू नाईक, श्री.संतान पावलू सोज, श्री. गजानन नारायण कांबळी, श्री.दिलीप केशव कुडव, श्रीजा अल्केश डोंगरे आणि प्रिनल प्रवीण कांबळी त्याच प्रमाणे सल्लागार तज्ञ संचालक श्री. शंकर कांबळी, श्री. जनार्दन पडवळ आदी उपस्थित होते.