न्यायासाठी मुलीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
राजापूर प्रतिनिधी : तालुक्यातील रायपाटण येथील वैशाली शांताराम शेट्ये (वय ६८) या वृद्ध महिलेचा राहत्या घरी खून होऊन वर्ष उलटले, तरी या प्रकरणाचा उलगडा झालेला नसल्याने त्यांच्या मुलीने न्यायासाठी जिल्हा पोलीस अधिक्षंकाडे धाव घेतली आहे. या प्रकरणी सौ. जानवी जयेश पाथरे (माहेरचे नाव रूपाली शेट्ये) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करून या प्रकरणी न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
वैशाली शेट्ये यांचा १५ ऑक्टोबर २०२५ रोजी रायपाटण येथील राहत्या घरी खून झाला होता. या घटनेनंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला; मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही हत्येमागील सत्य समोर आलेले नाही. आपल्या आईला न्याय मिळावा आणि तिच्या हत्येमागे असलेल्या व्यक्तीला कायद्यानुसार शिक्षा व्हावी, या अपेक्षेने जानवी पाथरे माहेरचे नाव रूपाली शेट्ये यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आपली व्यथा मांडली आहे.
तक्रारीत त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या कर्तव्यदक्षतेवर विश्वास व्यक्त केला आहे. आपण मोठ्या अपेक्षेने आपले दुःख त्यांच्यासमोर मांडत असल्याचे नमूद करत, या हत्येचा सखोल तपास करून दोषी व्यक्तीला पाठीशी न घालता योग्य ती शिक्षा मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आईच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी या प्रकरणातील सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
आईच्या हत्येचा तपास पुढे सरकत आहे का, याची माहिती घेण्यासाठी रूपाली शेट्ये यांनी गेल्या वर्षभरात तपास अधिकाऱ्यांकडे अनेकदा विचारणा केली. मात्र, प्रत्येक वेळी अपेक्षित उत्तर न मिळाल्याने त्यांना निराशेचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे.












