रायपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर गांगण यांचे निधन

राजापूर प्रतिनिधी : तालुक्यातील रायपाटण गावातील लोकप्रिय व्यक्तिमत्व भास्कर तुकाराम गांगण (७०) यांचे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे नानावटी रुग्णालयात ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
रायपाटण गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान मोलाचे होते. रायपाटण गावची ग्रामदेवता श्री वडची आई देवीच्या मंदिर निर्माण कामात निधी संकलनासाठी त्यांचे मोलाचे योगदान होते.गावच्या विकासासाठी ते सदैव तत्पर असायचे. भास्कर गांगण यांचा पंचक्रोशीसह सर्व समाजात दांडगा जनसंपर्क होता, भाई या टोपण नावाने ते सर्वांना परिचित होते.
गावातील अनेक महत्वाच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. श्री वडचीआई मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी आपले तन मन धन अर्पण करून घेतलेली निधी संकलन अध्यक्ष पदाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. त्याच्या देखरेखी खाली मंदिराचे भव्यदिव्य काम पूर्ण आले. उत्कर्ष दिप युवा मंडळ- गांगणवाडीचे ते अध्यक्ष होते. रायपाटण गांगणवाडीत त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांच्या आकस्मिक निधनाने रायपाटण सह पूर्व परीसरात शोककळा पसरली. मुंबई मधील (पार्ले ) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले..त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, सुना असा परिवार आहे.