चिपळूण (प्रतिनिधी) : लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत व्हावा आणि समाजात निर्भीड तसेच निष्पक्ष पत्रकारितेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशन’, ‘पुणे श्रमिक पत्रकार संघ’ आणि ‘नॅरेटिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डरो मत! – ऑनरिंग फिअरलेस जर्नलिझम’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडलेल्या या दिमाखदार कार्यक्रमात NDTV मराठीच्या प्रतिनिधी आणि अँकर ऋतुजा कदम यांच्यासह विविध माध्यमांतील पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद लोकमतचे निवासी संपादक संजय आवटे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संवादात्मक पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट आणि माजी आमदार राहुल बोंद्रे उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना ऋतुजा कदम म्हणाल्या, “आजच्या काळात निष्पक्षता आणि सत्याची बाजू मांडणे हे प्रत्येक पत्रकाराचे आद्य कर्तव्य आहे. NDTV मराठीच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचे प्रश्न आणि वास्तव निर्भयपणे मांडण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. हा सन्मान केवळ माझा एकटीचा नसून, डिजिटल व मुख्य प्रवाहातील पत्रकारितेत अहोरात्र राबणाऱ्या माझ्या संपूर्ण टीमचा आणि कॅमेरामन सहकाऱ्यांचा आहे. ‘डरो मत’ ही केवळ एक संकल्पना नसून, आव्हानात्मक परिस्थितीत पत्रकारिता करताना आम्हाला बळ देणारी ताकद आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय आवटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या डिजिटल युगात बातम्यांचा वेग वाढला असला, तरी बातमीची सत्यता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. अशावेळी समाजात निर्भीडपणे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. डॉ. संजय तांबट यांनीही नव्या पिढीतील पत्रकारांनी पत्रकारितेची मूल्ये जपत काम करण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात ऋतुजा कदम यांच्यासोबतच मंदार गोंजारी (ABP माझा), निखिल सुकाळे (जय महाराष्ट्र), दीपक मुणोत (सिव्हिक मिरर), ब्रिजभूषण पाटील (सकाळ) आणि सागर आव्हाड (साम टीव्ही) या पत्रकारांनाही त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरवण्यात आले. सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पॅनेल डिस्कशनमध्ये आजच्या काळातील सोशल मीडियाचा प्रभाव, टीआरपीची स्पर्धा, फेक न्यूजचे आव्हान आणि संपादकीय स्वायत्तता यांसारख्या विविध विषयांवर चर्चा झाली. या कार्यक्रमाला शहरातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













